‘चतुरंग प्रतिष्ठान’ आयोजित ‘सवाई एकांकिका’स्पर्धेची अंतिम फेरी २५ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता प्रभादेवीमधील रवींद्र नाटय़ मंदिर येथे आयोजित करण्यात आली आहे.

अंतिम फेरीसाठी जून-जुलै, सेल्फी, जेवणावळ, कस्टमर केअर, दृष्टी, बत्ताशी, भाव (अ)पूर्ण श्रद्धांजली या एकांकिकांची निवड करण्यात आली आहे. प्राथमिक स्पर्धेच्या फेरीत २४ संस्थांच्या नाटय़कृती सादर झाल्या होत्या. प्राथमिक फेरीतून दीपक राजाध्यक्ष, ‘लोकसत्ता’चे ‘फिचर एडिटर’ रवींद्र पाथरे, शेखर ढवळीकर या परीक्षकांनी सात एकांकिकांची निवड केली. २३ जानेवारी रोजी सकाळी ८.३० पासून रवींद्र नाटय़मंदिर येथे प्रवेशिका देण्यात येणार आहेत.

 

‘नवरा माझा दुसऱ्याचा’ नाटक  रंगभूमीवर

सुनील पवार लिखित व शामराव मांजरेकर दिग्दर्शित ‘नवरा माझा दुसऱ्याचा’ हे विनोदी नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होणार आहे. अभिनेत्री सिया पाटील या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पर्दापण करत असून नाटकात किशोर चौघुले, मैथिली वारंग, परी जाधव, अक्षय अहिरे, रोहित माने हे कलाकार आहेत. एका कुटुंबात अकल्पित घडलेल्या घटनेमुळे त्यांच्यासमोर निर्माण झालेला पेच व यातून सुटका करून घेण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नातून होणारी धमाल यात सादर करण्यात आली आहे.

२० जानेवारी रोजी गडकरी रंगायतन येथे नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.