परस्परसंमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३७७ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात आज अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात येणार आहे.
याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेकांनीच आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून ‘सेक्रेड गेम्स’ फेम ‘कुक्कू’ म्हणजेच अभिनेत्री कुब्रा सैतही यात मागे राहिलेली नाही. नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमध्ये कुब्राने ट्रान्सजेंडरची भूमिका साकारली होती. अतिशय लहान पण, तितक्याच प्रभावी भूमिकेमुळे कुब्रा फार कमी वेळातच प्रकाशझोतात आली.
‘बॉलिवूड लाइफ’ला दिलेल्या मुलाखतीत तिने या मुद्द्यावर आपलं मत मांडत एलजीबीटी समुदायाला एक संदेशही दिला. ‘मी इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छिते की, एलजीबीटींकडून मी काही शिकले असेन, तर ते म्हणजे एखादा बदल घडवून आणण्यासाठी झटण्याची त्यांची वृत्ती. बऱ्याच वर्षांपासून एखाद्या गोष्टीमध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. मुळात तुमचं अस्तित्व हे तुमच्याच हातात आहे. आवडत्या व्यक्तीवर प्रेम करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे आणि त्यामुळेच मी या साऱ्यांचा आदर करते. सद्यस्थिती पाहता जर त्यांची इच्छा असेल तर, मी त्यांच्यावतीने लढा देण्यासाठीही तयार आहे. त्यांच्या बाजून उभी राहण्यास तयार आहे’, असं कुब्रा म्हणाली.
वाचा : #Section377 : ‘स्वच्छंदपणे आणि सर्वांसमोर प्रेम करण्याचं स्वातंत्र्य हवंय’
आपण एलजीबीटी समुदायाकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. कारण, बदल घडवून आणण्यासाठी योग्य माहितीही अत्यावश्यक असते, असं म्हणत तिने एक महत्त्वाचा मुद्दाही मांडला आहे. कुब्राने या मुलाखतीत या समुदायाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या अनेकांचेच आभारही मानले आहेत.