चार दशकांहून आधिक काळ हॉलीवूड अभिनयसृष्टीवर राज्य करणारे चिरतरुण वुडी अ‍ॅलन आज वयाच्या ८२ व्या वर्षीदेखील त्याच उत्साहाने कार्यरत आहेत. त्यांनी आजवर ‘अ‍ॅनी हॉल’, ‘मॅनहॅटन’, ‘हॅना अँड हर सिस्टर्स’, ‘रेडिओ डेज’, ‘मिडनाइट इन पॅरिस’ यांसारख्या एकाहून एक सरस अशा अनेक मालिका आणि सिनेमांची निर्मिती केली आहे. परंतु केवळ आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या या ऑस्कर पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाला कधीही लोकप्रियता, प्रसिद्धी किंवा चर्चेत राहण्यासाठी कोणत्याही पब्लिसिटी स्टंटची गरज भासली नाही. पण सध्या पॉप गायिका सेलेना गोमेझबरोबर झालेल्या वादविवादामुळे ‘वुडी अ‍ॅलन’ पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

सेलेना गोमेझने वूडींच्या ‘अ रेनी डे इन न्यूयॉर्क’ या अगामी चित्रपटात काम करण्यास नकार दिला. परंतु हा नकार तिने आपल्या आईच्या माध्यमातून ट्विटरद्वारे आणि चित्रपटाचे निम्मे चित्रीकरण झाल्यावर दिला. त्यामुळे सेलेनाविरोधात टीकेची लाट उसळली आहे. तिची आई मँडी तिफीने चित्रपटाची पटकथा न आवडल्यामुळे सेलेना त्यांच्याबरोबर काम करण्यास इच्छुक नाही. त्यामुळे त्यांनी संपर्क साधून कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नये, अशा धमकीवजा शब्दांत तिचा निर्णय ऐकवला आहे.

या ट्विटमुळे नाराज झालेल्या ब्रायन क्रॅन्स्टन, सर बेन किंग्जले, स्टीव्हन स्पिलबर्ग, गलीरमो डेल टोरो यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी सेलेनाच्या मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते चित्रपटासाठी होकार देण्यापूर्वीच तिने पटकथा व्यवस्थित पडताळून पाहणे अपेक्षित होते. तसेच त्यानंतरही काही कारणास्तव नकार द्यायचाच होता तर फोन किंवा ई-मेलच्या माध्यमातूनही नकार देता आला असता त्यासाठी ट्विटरबाजी करण्याची गरजच नव्हती. तसेच सेलेनाने एका मुलाखतीदरम्यान वुडींच्या कार्यक्षमतेवर टीका केली. त्यामुळे क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला हा वाद आता आणखी धुमसू लागला आहे, परंतु वूडी अ‍ॅलन यांनी समंजसपणा दाखवत कोणतीही प्रतिक्रिया न देता केवळ तिच्या हेकेखोरपणाला शुभेच्छा दिल्या आहेत.