|| नीलेश अडसूळ

गेल्या दशकभरात मालिका या चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक घरातला अविभाज्य भाग झाल्या आहेत. त्या घराघरांत पोहोचण्यामागे वाहिन्यांसह निर्मितीतील संपूर्ण चमूचा मोठा वाटा असला तरी मालिकांची कथा, पटकथा आणि संवाद याचे लेखकांना जाणारे श्रेय काकणभर उजवेच ठरते. बदलत्या काळानुसार झालेले कथेतील- चित्रीकरणातील बदल, वाहिन्या- निर्मात्यांची गणिते, स्वत:चे विचार आणि वाढलेल्या स्पर्धा अशी नाना आव्हाने पेलून लेखक त्या मालिका लिहीत असतात. अशाच एका लेखिकेने मालिका लेखनाची पंचवीस वर्षे नुकतीच पूर्ण केली. या पंचवीस वर्षांच्या प्रवासात ‘दामिनी’पासून ते आताच्या ‘अजूनही बरसात आहे’पर्यंत अनेक कथांना सजीव करून घराघरांत पोहोचवणारे हे नाव म्हणजे ‘रोहिणी निनावे’.

‘साहित्य, लेखन याची आवड मला होतीच शिवाय ज्येष्ठ लेखक, कवी वसंत निनावे हे माझे वडील असल्याने त्यांच्याकडूनही मला वारसा मिळाला होता. सुरुवातीला मी कविता लिहायचे. मग शीर्षकगीत लिहू लागले आणि अभिनयही सुरू होता. या दरम्यान गौतम अधिकारी यांनी मला ‘परमवीर’ आणि ‘हॅलो इन्स्पेक्टर’ या मालिकांचे हिंदीत रूपांतर करण्याची संधी दिली. ते करत असताना मालिका लेखनाचा बाज माझ्या लक्षात आला. पुढे त्यांनी मला ‘पत्रकारितेवर आधारित काही कथा आहे का?’ असे विचारले. त्या वेळी मी मंत्रालयात काम करत असल्याने पत्रकारांचे आयुष्य जवळून पाहात होते. त्यातूनच मी ‘दामिनी’ ही कथा त्यांच्यासाठी लिहिली. कथा लिहिल्यानंतर जवळपास पाच वर्षांनी ‘दूरदर्शन’मधून या कथेची मालिकेसाठी निवड झाली आणि गौतम अधिकारी यांनी मला मालिका लेखनासाठी प्रोत्साहन दिले. ती माझी पहिली मालिका,’ असे रोहिणी यांनी मालिका लेखनातील पहिल्या पुष्पाच्या आठवणी उलगडताना सांगितले.

 ‘मालिका लेखन मला कुणीही शिकवले नाही. ते अनुभवातून मीच माझे शिकत गेले, तंत्र विकसित करत गेले. कारण तुम्हाला नुसते तंत्र लक्षात येऊन चालत नाही त्यात सातत्य टिकवण्यासाठी प्रतिभाही गरजेची आहे, असे मला वाटते. मालिकेतील प्रसंग, व्यक्तिचित्रण यावर हळूहळू प्रभुत्व मिळत गेले आणि अनेक मालिका लेखनाची संधी मला मिळाली. पुढे ‘अवंतिका’ मिळाली, मग ‘अवघाची संसार’, ‘ऊन पाऊस’, ‘अधुरी एक कहाणी’ हा नायिकाप्रधान मालिकांचा प्रवास सुरू झाला आणि त्यातली पात्रंही लोकप्रिय झाली,’ असे त्या म्हणाल्या.

बदलत्या तंत्रज्ञानासोबत मालिका क्षेत्रातील आव्हाने आणि स्पर्धा वाढली. या स्पर्धेत अनेक वाहिन्या उतरल्याने मोठ्या प्रमाणात आशयाची गरज निर्माण झाली आणि लेखकांवरील ताण वाढला. सध्या लेखक एका वेळी अनेक मालिकांचे लेखन करण्याचे शिवधनुष्य पेलत आहेत. प्रत्येक मालिकेचे वेगळेपण जपताना होणारी कसरत त्यांनी अगदी सोप्या शब्दात मांडली. ‘एखादा नट अनेक भूमिका करत असतो तसेच आम्हीही त्या त्या वेळी वेगळ्या जगात प्रवेश करून इतर दारे बंद करून घेतो. एखादी मालिका लिहीत असताना त्याच्याशी मी इतकी एकरूप होते की इतर मालिकेतील पात्र त्यात डोकावत नाहीत. एकासारखे दुसरे पात्र निर्माण करायचे नाही याची मी खबरदारी घेते. जितक्या मालिका मी लिहिते तितक्या कथाविश्वातून माझा प्रवास होत असतो’, असे त्यांनी सांगितले.

 बदलत्या काळानुसार मालिकांचे आशय, विषय आणि मांडणी बदलल्याचे त्याही नमूद करतात. ‘पूर्वी मालिका ठरावीक भागांच्या आणि विशिष्ट कथा घेऊन केल्या जायच्या. यामध्ये लेखकालाही विचार करायला वेळ असायचा. पुढे मालिकांना गती मिळाली आणि त्यातले नाट्य वाढत गेले. या मालिकांमध्ये भावनापूर्ण नाट्य असले तरी अतिरंजित नाट्य नव्हते. पुढे वाहिन्या वाढल्याने मालिका वाढल्या आणि अधिकाधिक नाट्यमय मालिका करण्याकडे भर दिला जाऊ लागला. टीआरपीमुळे स्पर्धा अधिक तीव्र झाली. उद्याच्या भागाचेच नाही तर विश्रांतीनंतर काय घडणार याची उत्कंठा कशी वाढवायची याचे तंत्र तयार झाले. मग चाकूसुरे आले, पायरीवर तेल टाकून पाडणे आले, खिरीत विष मिसळणे आले अशा षड्यंत्र कृती वाढू लागल्या. हे लेखन यशस्वी होऊ लागल्याने लेखकांनीही त्यानुसार लेखनात बदल केले. आता तर ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्या त्या गावातील भाषा, परंपरा लक्षात घेऊन मालिका लिहाव्या लागतात. या निमित्ताने अनेक नव्या कलाकारांना संधी मिळाली, अनेकांना रोजगार मिळाले ही बाब महत्त्वाची वाटते,’ असे त्या सांगतात.

‘समाजमाध्यमांवर लिहून लेखक झाल्याचा भास अनेकांना होतो, पण मालिका लेखन किती आव्हानात्मक आहे हे त्या ठिकाणी आल्यावरच समजते. एखादी कथा लिहिताना प्रेक्षकांची आवड, कलाकारांचे म्हणणे, वाहिन्यांची मते, सल्ले, सूचना, टीका अनेक मर्यादा सांभाळून काम करावे लागते. सेटवर झालेले बदल, कलाकारांची उपस्थिती, लोकेशन काय आहे, गच्ची आहे की जिना आहे, अशा बदलत्या गरजेनुसार लेखन करण्यात अवघा दिवस व्यापून जातो. त्यातही बजेटचे भान ठेवून लिहावे लागते. एखादा प्रसंग लिहिताना तो वास्तवात आणण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक गणितांचा विचार करावा लागतो,’ सहज सोप्या वाटणाऱ्या मालिकांमागे दडलेली लेखकांची ही कैफियत यानिमित्ताने रोहिणी यांनी रसिकांसमोर मांडली.

‘मालिकेतल्या नायिकांनी बंड करायला हवा. त्या केवळ शोषित असून चालणार नाहीत. ज्या मालिकांमध्ये नायिकेच्या बंड करण्याला नकार दिला जातो, ती मालिका मी पुढे लिहीत नाही. ‘मनाला पटेल तसं वागणं’ ही त्या त्या काळाची गरज असते आणि ती लक्षात घेऊन मी नायिका रंगवते,’ असे मत त्यांनी नायिकांविषयी व्यक्त केले.

  ‘मी स्वत: सातशे भागांपर्यंत मालिका लिहिल्या असल्या तरी याला कुठे तरी खंड पडावा असे मला वाटते. कारण एका क्षमतेनंतर त्या मालिकांचा कस निघून जातो आणि प्रेक्षकांसाठीही मालिका स्मरणीय नाही तर रटाळ होऊ लागतात. त्यामुळे मर्यादित भागांच्या आशयसंपन्न, कथा- कादंबऱ्यांवर आधारित मालिका येण्याची आज गरज आहे. किंबहुना तशी मालिका लिहिण्याच्या मी प्रतीक्षेत आहे,’ अशी आशा त्यांनी मुलाखतीला पूर्णविराम देताना बोलून दाखवली.

भाषा महत्त्वाचीच…

‘लेखनाच्या क्षेत्रात येण्यासाठी प्रचंड वाचन करणे गरजेचे आहे. त्याशिवाय आपल्या विचारांच्या कक्षा रूंदावणार नाहीत. त्या त्या काळातील लेखकांनी कशा पद्धतीने व्यक्तिचित्रण केले आहे याचा अभ्यास या निमित्ताने होतो. जेव्हा लेखनात तुम्ही नावीन्य देता तेव्हा तुम्ही स्पर्धेत टिकता. समाजात, कला क्षेत्रात सध्या काय सुरू आहेत याची माहिती आपल्याकडे असायला हवी.  कथा, पटकथा, मालिका, संवाद लिहिताना सर्वात महत्वाचे म्हणजे भाषेवर प्रभुत्व असायला हवे. प्रमाण मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी यांचेही उत्तम ज्ञान हवे. सध्या मालिका जगतात बोली भाषांना महत्त्व आल्याने त्याही भाषा आपल्याला अवगत असायला हव्या. त्या नसतील तर त्यावर अभ्यास करून त्या आत्मसात करायची तयारी हवी. श्लोक, कविता, शेरोशायरी याचेही ज्ञान असायला हवे,’असे मार्गदर्शन त्यांनी लेखक म्हणून येणाऱ्या नव्या पिढीला केले.

काहीशी खंत…

‘मालिकांबाबत प्रेक्षक अनेकदा लेखकांवर टीका करतात. त्यांनी त्या जरूर कराव्या पण मर्यादा ठेवून, असे मला वाटते. कारण मालिका लिहिताना आम्ही सर्वस्व पणाला लावत असतो. प्रत्येक कथा लेखकाच्या मर्जीने चालत नाहीत. हल्ली तर लेखकांनी कथा घेऊन जाणे आणि त्याची मालिका होणे हा भागच जवळपास बंद झाला आहे. लेखक खूप काही लिहू शकतील पण टीआरपी च्या गणितांमुळे त्यांचेही हात बांधले आहेत. शिवाय लेखन हे आम्ही व्यवसाय म्हणून स्वीकारल्याने समोर आलेल्या कथेला न्याय देणे आमचे काम आहे. बऱ्याचदा चांगली कथा, चांगले प्रसंग टीआरपीमुळे वगळावे लागतात तेव्हा आम्हालाही त्रास होतो. कधी मनाविरुद्ध लिहावे लागते. पण याचा अतिरेक होतो तेव्हा आम्ही मालिकाही सोडतो. त्यामुळे प्रेक्षकांनी टीका करताना आम्हाला समजून घ्यायला हवे,’अशी खंत त्या व्यक्त करतात.