शाहरुख खानला बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळखले जाते. वर्षभरात प्रदर्शित होणा-या हिट चित्रपटांमध्ये शाहरुखचा चित्रपट त्यात नाही, असे कधीच होत नाही. मात्र, याच शाहरुखने मि.परफेक्शनिस्ट आमिर खानची स्तुती केली आहे.
” आमिर हा देशाला लाभलेला सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे. ‘धूम ३’साठी त्याला पिळदार शरीरयष्टीची गरज होती. त्याकरिता त्याने तशी मेहनतही घेतली. आमिरची काम करण्याची पद्धत आणि त्याने केलेले काम हे नेहमीच प्रेरणादायी असते. मी खरोखरच त्याची प्रशंसा करतो, या शब्दांमध्ये शाहरुखने मि.परफेक्शनिस्टची स्तुती केली.
‘धूम ३’मध्ये आमिरने खलनायकाची भूमिका साकारली आहे. शाहरुखलादेखील पुन्हा खलनायकाची भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचे त्याने यावेळी सांगितले. त्याने ‘डर’, ‘बाझिगर’ आणि ‘अनजाम’ या चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका केली आहे.