हल्लीच्या दिवसांमध्ये विविध मार्गांनी चित्रपटाचे प्रमोशन करण्यावर कलाकार जास्त भर देतात. कोणी ‘बिहाइंड द सीन्स’चे व्हिडिओ प्रदर्शित करतं, तर कोणी चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्या चाहत्यांना भेट देतं. बहुविध मार्गांनी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये हे कलाकार कसलीही कसर शिल्लक ठेवत नाहीत. बॉलिवूडचा किंग खानही सध्या त्याच्या आगामी ‘रईस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. बऱ्याच कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर आता शाहरुख खानने ‘रईस’च्या प्रमोशनसाठी थेट ऑगस्ट क्रांती एक्सप्रेस गाठली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या ट्विटर अकाऊंटवरुन शाहरुख ट्रेनमध्ये बसतानाचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई सेंट्रल येथून शाहरुखने ऑगस्ट क्रांती एक्सप्रेस ही ट्रेन गाठली असून तो उद्या याच ट्रेनने दिल्लीला पोहोचणार आहे. दिल्लीमध्ये किंग खान त्याच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे प्रमोशन करणार आहे. अवघ्या काही दिवसांवरच ‘रईस’च्या प्रदर्शनाची तारीख आल्यामुळे प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शाहरुख खानच्या नावाभोवती असणारं प्रसिद्धीचं वलय आणि दिवसागणिक वाढणारा त्याच्या चाहत्यांचा आकडा अनेकांचेच लक्ष वेधत आहे. त्यामुळे प्रेक्षक किंग खानच्या ‘रईस’ या चित्रपटाला कितपत पसंती देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चित्रपटाचे डायलॉग आणि गाणीसुद्धा चांगलीच लोकप्रियता मिळवत आहेत.

वाचा: ‘रईस’च्या निमित्ताने शाहरुखची खास मुलाखत

याच चित्रपटाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी शाहरुखने प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला होता. त्यावेळी ‘रईस’ या चित्रपटाबद्दल आणि चित्रपटसृष्टीच्या आजवरच्या कारकिर्दीबद्दल शाहरुखने मनमोकळ्या गप्पा मारल्या. रईसच्या डोळ्यात सुरमा भरलेल्या निराळ्या लूकपासून ते अगदी या चित्रपटातील सर्वात आव्हानात्मक दृश्याच्या चित्रिकरणाचा किस्साही शाहरुखने या संवादादरम्यान उलगडला. माहिरा खान आणि शाहरुख यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘रईस’ या चित्रपटामध्ये नवाझुद्दीन सिद्दीकी, अतुल कुलकर्णी हे कलाकारही झळकणार आहेत.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan boarded august kranti express from mumbai central to promote raees
First published on: 23-01-2017 at 20:25 IST