दर दिवाळीला बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ या निवासस्थानी कलाकारांसाठी जंगी पार्टीचं आयोजन केलं जातं. या वर्षीसुद्धा बी-टाऊनमधील बरेच कलाकार या पार्टीला उपस्थित होते. मात्र, या सेलिब्रेशनला गालबोट लागलं. ऐश्वर्या राय बच्चनची मॅनेजर अर्चना सदानंदच्या लेहंग्याला पणतीमुळे आग लागली. मात्र शाहरुख खानच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला.

‘जलसा’च्या अंगणात ऐश्वर्याची मॅनेजर अर्चना तिच्या मुलीसोबत असताना हा अपघात घडला. रात्रीचे तीन वाजले होते. त्यामुळे फार कमी पाहुणे उपस्थित होते. अंगणात ठेवलेल्या पणतीमुळे अर्चनाच्या लेहंग्याला आग लागली. हे पाहताच क्षणी शाहरुखने त्वरित त्याचं जॅकेट काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला.

या दुर्घटनेत अर्चना यांचे हात व पाय १५ टक्के भाजले. तर किंग खानलाही थोडी दुखापत झाली. अर्चना यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. तर शाहरुखच्या प्रसंगावधानाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.