अभिनेता शाहिद कपूरचा बहुचर्चित चित्रपट ‘कबीर सिंग’चा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘कबीर सिंग’ हा दाक्षिणात्य चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा हिंदी रिमेक आहे. ‘कबीर सिंग’मधील शाहिद कपूर हा ‘अर्जुन रेड्डी’मधील भूमिका साकारणाऱ्या विजय देवरकोंडासारखा दिसत आहे. कबीर सिंग ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी शाहिद कपूरने फार मेहन घेतली आहे. तसेच ही मेहनत घेताना शाहिदने असे काही केले आहे की सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

‘कबीर सिंग’ या चित्रपटात शाहिद वैद्यकिय शाखेतील विद्यार्थ्याच्या भूमिकेत दिसत आहे. ही विद्यार्थ्याची भूमिका साकारण्यासाठी शाहिदने दिल्लीतील एका कॉलेजमध्ये वेळ घालवण्यास सुरुवात केली. कॉलेजचे विद्यार्थी कशा प्रकारे राहतात कसे वागतात अशा अनेक गोष्टी शाहिद त्यांच्याकडून शिकत होता. तसेच शाहिदने हुबेहूब विद्यार्थ्याची भूमिका साकारण्यासाठी विद्यार्थांचे कपडे देखील वापरल्याचे ‘इंडिया टूडे’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

‘शाहिद कपूरने कबीर सिंगची भूमिका साकारण्यासाठी दिल्लीमधील अनेक कॉलेज विद्यार्थांशी संवाद साधला. तसेच ही व्यक्तिरेखा हुबेहूब वाटण्यासाठी त्याने कॉलेजच्या मुलांचे कपडे देखील वापरले’ असे समोर आले आहे.

कबीर सिंग ही शाहिदच्या करिअरमधील सर्वात कठीण भूमिका असल्याचे शाहिदने सांगितले. या चित्रपटात शाहिद व्यसानाधीन भूमिकेत असल्यामुळे त्याला चित्रीकरणादरम्यान मोठ्या प्रमाणात सिगारेट आणि विडीचे सेवन करावे लागले आहे.

‘माझा धुम्रपान करण्याला नेहमी विरोध असतो. पण ‘कबीर सिंग’ चित्रपटातील नायक मोठ्या प्रमाणावर धुम्रपान करणारा आहे. त्याची भूमिका निभावणे माझ्यासाठी सोपे काम नव्हे. एकदा तर अशी वेळ आली की मला दिवसभरात २० सिगारेट ओढाव्या लागल्या. चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर माझ्या शरीराला सिगारेटचा वास येऊ नये म्हणून मी घरी जाण्याआधी दोन तास अंघोळ करायचो’ असे शाहिदने सांगितले होते.