scorecardresearch

‘महाराष्ट्र शाहीर’ची झलक प्रकाशित

संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश १९६० साली आला, त्यात अनेक लोकांचे योगदान होते; पण त्या काळात शाहिरांनी दिलेले योगदान खूप मोठे होते

maharashtra shaheer movie teaser
महाराष्ट्र शाहीर’

‘जय जय महाराष्ट्र माझा..’ हे अजरामर महाराष्ट्रगीत देणाऱ्या शाहीर साबळे यांच्या जीवनावरील ‘महाराष्ट्र शाहीर’ या बहुचर्चित चित्रपटाची पहिली झलक शाहिरांच्या आठव्या स्मृतिदिनी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतीच प्रकाशित करण्यात आली. या वेळी शाहिरांच्या पत्नी राधाबाई कृष्णराव साबळे, दिग्दर्शक केदार शिंदे, प्रमुख कलाकार अंकुश चौधरी, सना केदार शिंदे, निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे, संगीतकार अजय-अतुल तसेच पटकथा-संवाद लेखिका प्रतिमा कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते. 

शाहिरांबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी या वेळी म्हटले, ‘‘कोणताही स्वातंत्र्यलढा, कोणतीही सामाजिक चळवळ ही मनामनांत, घराघरांत पोहोचविण्याचे काम हे लोककलाकार करत असतात. जगभरात हे झालेले आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश १९६० साली आला, त्यात अनेक लोकांचे योगदान होते; पण त्या काळात शाहिरांनी दिलेले योगदान खूप मोठे होते. अशा लोकांमुळे स्वातंत्र्यलढा असो की संयुक्त महाराष्ट्रसारखी चळवळ असो, त्या जवळ येत जातात. हे लोक मनामनांत  पोहोचलेले असतात. कोणतीही चळवळ सांघिक स्वरूपात नेण्यात अशा लोकांचा फार मोठा वाटा असतो. शाहिरांचे हे सर्वात मोठे योगदान आहे.’’ शाहीर साबळे यांच्या पत्नी राधाबाई कृष्णराव साबळे यांनीही ‘‘हा माझ्यासाठी एक अत्यंत हळवा प्रसंग आहे. आज मी भावुक झाले आहे,’’ अशा शब्दांत आनंद व्यक्त केला. तर संगीतकार अजय-अतुल यांनी आम्ही शाहिरांकडून खूप शिकलो. त्यांच्यामुळे केदार आणि आमची मैत्री झाली. या चित्रपटाचा भाग होता आले, हे आमचे भाग्य आहे, असे या वेळी सांगितले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 01:31 IST

संबंधित बातम्या