बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा सध्या त्यांच्याच मुलांची चाहत्यांमध्ये क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे हे स्टारकिड चाहत्यांसाठी आणि प्रसारमाध्यमांसाठी आकर्षणाचा विषय ठरतात. त्यातही काही प्रसिद्ध कलाकारांच्या मुलांविषयीच्या लहानसहान गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. त्यातीलच एक स्टारकिड म्हणजे शाहरुख खानची लेक सुहाना खान. सुहानाने नुकतेच तिच्या पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून गौरी खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट शेअर केली आहे. यावेळी शाहरुख खाननेही सुहानासाठी एक मेसेजही दिला आहे.
सुहानाने लंडनमधील ‘Ardingly College’मधून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे यावेळी सुहानाला एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. सांस्कृतिक कार्यक्रमातील योगदान दिल्याबद्दल तिला हा पुरस्कार मिळाला आहे. गौरीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुहाना पुरस्कार स्वीकारताना दिसत आहे.
गौरीप्रमाणेच शाहरुखने ट्विटरवर आर्डिंगली कॉलेजच्या कॅन्टीनमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शाहरुखसोबत सुहाना आणि गौरी दिसून येत आहेत. “चार वर्ष उलटली, आर्डिंगलीमधून पदवीधर झाली. शेवटचा पिझ्झा, शेवटच्या ट्रेनचा प्रवास..खऱ्या आयुष्यातलं पहिलं पाऊल, शालेय जीवन संपलं आहे, मात्र शिकण्याचा प्रवास नाही”,असं कॅप्शन देत शाहरुखने सुहानाला मोलाचा सल्लाही दिला आहे.
4 yrs have flown by. Graduating from Ardingly. Last pizza…last train ride…and first step into the real world…school ends…learning doesn’t. pic.twitter.com/hKHPIj0ffe
— Shah Rukh Khan (@iamsrk) June 28, 2019
दरम्यान, गेल्या वर्षी शाहरुखचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटासाठी सुहानाने असिस्टंट म्हणून काम केलं होतं. काही दिवसांपूर्वीच सुहानाने तिच्या एका मित्रासाठी एका शॉर्टफिल्ममध्ये काम केलं होतं. त्यामुळे सुहानालादेखील शाहरुखप्रमाणेच अभिनयाची आवड असल्याचं दिसून येतं.