पाकिस्तानमधील तणावाचे वातावरण सध्यातरी कमी होण्याचे नाव घेत नाहीये असेच चित्र पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपटांवरील बंदी उठविण्यात येणार असल्याची चर्चा होती. रविवारी शाहरुख खानचा ‘रईस’ हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्यात येणार होता. पण, या चित्रपटामध्ये मुस्लिम समुदायाचे चित्रण चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्यामुळे या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे.
एव्हाना शाहरुख आणि माहिरा खान स्टारर ‘रईस’ हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणे अपेक्षित होते. पण, तेथील सेन्सॉर बोर्डाच्या सांगण्यावरुन अद्यापदी हा चित्रपट पाकिस्तानी प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही. टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेले वृत्त आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘या चित्रपटामध्ये इस्लाम धर्माशी निगडीत काही बाबी आक्षेपार्ह पद्धतीने दाखविण्यात आल्या आहेत. त्यासोबतच मुस्लिम धर्मातील लोकांना या चित्रपटामध्ये गुन्हेगाराप्रमाणे दाखविण्यात आल्यामुळेही या चित्रपटाविरोधात नाराजीचा सूर आळविण्यात येत आहे’.
वाचा: शाहरुखने केली ‘जालिमा’ माहिराची इच्छापूर्ती
राहुल ढोलकिया दिग्दर्शित ‘रईस’ या चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान मुख्य भूमिकेत असून पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खानसोबत त्याची ऑनस्क्रिन केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळत आहे. सध्या हा चित्रपट प्रेक्षकांची चांगलीच दाद मिळवत असून बॉक्स ऑफिसवरही चर्चेत आहे. दरम्यान, ३० सप्टेंबरपासून पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात आली होती. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये असणारे तणावाचे वातावरण पाहता भारतामध्येही पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतरच पाकिस्तानमध्येही भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली होती. पण, आता मात्र ही परिस्थिती कितपत बदलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.