डोक्यावर मोरपीसांची पर्वताच्या आकाराची टोपी, गळ्यात अगदी बोटभर उंचीची पितळ्याची विठ्ठल-रखुमाई आणि चार पाच रुद्राक्षांच्या अन् दोन ते तीन कवड्याच्या माळा, कपाळावर उभा टीळा, कानाच्या पाकळ्यांवर पांढरा वर्तुळाकार आकारात लावलेला गंध, त्या गोल गंधाला भगव्या रंगाच्या शेंदुराची किनार, हातात दोन टाळं आणि चिपळ्या, अंगावर भगवी शाल किंवा फेटा वजा कापड, खाली धोतर, पायात वाहाण असं वासुदेवाचं रुप आपल्यापैकी अनेकांनी अनेकदा पाहिलं असेल. रविवारी सकाळी शहरांमध्येही दिसून येणारे वासुदेव ग्रामीण भागात तर अगदी नित्यनियमाने दिसतात. मात्र मुंबईमधील अशाच एका वासुदेवाला ऐकण्याचा मोह संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांनाही आवरला नाही. महादेवन यांनीच या वासुदेवाचा व्हिडिओ शेअर केला असून तो आता व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरांमध्ये इमारतीखाली वासुदेव आल्यावर लहान मुले अनेकदा पळत त्याला पहायला खाली जातात. असंच काहीसं झालं शंकर महादेवन यांच्याबरोबर. महादेवन यांच्या इमारतीखालून रस्त्यावरुन जाणाऱ्या वासूदेवाचा आवाज ऐकून खाली उतरले आणि त्या वासूदेवाशी गप्पा मारु लागले. त्यानंतर त्यांनी वासुदेवाला गाणं गाण्याचीही विनंती केली. महादेवन यांनीच हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये सुरुवातील महादेवन हे या वासुदेवाशी गप्पा मारताना दिसतात. “माझं नाव पोपट विधाते असं आहे. मी वयाच्या ११ व्या वर्षापासून असा वासुदेव म्हणून फिरतोय,” असं ही व्यक्ती व्हिडिओमध्ये महादेवन यांना सांगाता दिसते. त्यानंतर महादेवन त्यांच्या डोक्यावरील विठ्ठल रकुमाईची मुर्ती पाहून पोपट विधातेंचं कौतुक करतात. “हे पोपट विधाते साहेब रस्त्यावर गाणं गात होते. ते इतकं छान गातं होते मी विचार केला व्हिडिओ शूट करुन तुमच्यापर्यंत पोहचवावा असा विचार केला. आपल्या देशात किती कला आहे पाहा,” असं म्हणत महादेवन या वासुदेवाला गाणं ऐकवण्याची विनंती करतात. “हरे विठ्ठला वठ्ठला पांडुरंगा पंढरीनाथा… रामकृष्ण हरी बोला” अशी अभंगाची ओवी वासुदेव गाऊन दाखवतो. एक दोन जागी महादेवनही वासुदेवाला गाण्यात साथ देताना दिसतात.

या व्हिडिओला दीड हजारहून अधिक जणांनी शेअर केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shankar mahadevan shared a video of vasudev scsg
First published on: 27-02-2020 at 11:45 IST