‘हे नाटकच नाही’ म्हणत राज्य नाटय़ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतच परीक्षकांनी बाद ठरविलेले.. छबिलदास मुलींच्या शाळेत कोंडून ठेवल्यानंतर विजय तेंडुलकर यांनी तासाभरात लिहून दिलेला दुसरा अंक.. ‘रंगायन’ आणि नंतरच्या टप्प्यात ‘आविष्कार’ या नाटय़संस्थांची निर्मिती.. ‘लीला बेणारे’ या व्यक्तिरेखेमुळे लोकप्रिय झालेल्या सुलभा देशपांडे.. मराठी, हिंदूीसह विविध १६ भारतीय भाषांत रंगभूमीवर सादर झालेले नाटक आणि इंग्रजीसह परदेशी भाषांमध्ये चित्रपटाद्वारे झळकण्याचा बहुमान लाभललेले.. मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेल्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’ नाटकाला बुधवारी ५० वर्षे पूर्ण झाली.
विजय तेंडुलकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले, अरिवद देशपांडे यांच्या दिग्दर्शनाने सजलेले, सुलभा देशपांडे यांच्या समर्थ अभिनयाने नटलेले ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या नाटकाचा २० डिसेंबर १९६७ रोजी रवींद्र नाटय़ मंदिर येथे पहिला प्रयोग झाला होता. विजया मेहता परदेशी गेलेल्या असल्यामुळे ‘रंगायन’ची धुरा अरिवद देशपांडे यांच्याकडे होती. राज्य नाटय़ स्पर्धेत रंगायनची अब्रू जायला नको म्हणून तेंडुलकर यांना अक्षरश: बंद खोलीमध्ये बसवून बाहेरून कडी लावून त्यांच्याकडून हे नाटक लिहून घेतले. रंगीत तालीम करून २० डिसेंबर १९६७ रोजी राज्य नाटय़ स्पर्धेत या नाटकाचा प्रयोग झाला. सुरुवातीच्या काही प्रयोगांमध्ये सुलभासमवेत वकिलाची भूमिका सतीश दुभाषी यांनी केली होती. आम्हाला पारितोषिक मिळणार हा आत्मविश्वास होता खरा. पण, ‘हे नाटकच नाही’ असे म्हणून परीक्षकांनी पहिल्याच फेरीत बाद ठरविलेल्या ‘शांतता कोर्ट चालू आहे’ नाटकाने रंगभूमीवर इतिहास घडविला, अशा शब्दांत या नाटकाच्या जडणघडणीपासून असलेले ‘आविष्कार’ नाटय़संस्थेचे सर्वेसर्वा अरुण काकडे यांनी ‘शांतता..’च्या आठवणी जागविल्या. ‘नाटक कसे लिहू नये’ याचा ‘शांतता..’ हा वस्तुपाठ असल्याचे तेंडुलकर यांनी नमूद केल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री. पु. भागवत हे ‘रंगायन’चे अध्यक्ष तर, विजय तेंडुलकर उपाध्यक्ष होते. राज्य नाटय़ स्पर्धेमध्ये ‘एन्ट्री’ करताना आम्ही नाटककार तेंडुलकर एवढेच लिहिले होते. नाटक तयार नव्हते आणि तेंडुलकर यांना विषय सुचत नव्हता. एक दिवस ते रेल्वे स्टेशनवरून पाल्र्याला पायी घरी जात होते. त्यांच्यापुढे काही युवक चालले होते. त्यातील एकाने देशस्थ ऋग्वेदी संघाचा हॉल कुठे आहे, अशी विचारणा तेंडुलकर यांच्याकडे केली. हे युवक तेथे ‘अभिरूप न्यायालय’ सादर करणार होते आणि त्या विषयी त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. त्यांच्यामध्ये सुरू असलेली चर्चा ऐकतच तेंडुलकर घरी पोहोचले. घरी गेल्यावर त्यांनी अरिवद देशपांडे यांना दूरध्वनी करून नाटकाचा विषय सुचल्याचे सांगितले आणि लगोलग पहिला अंक लिहून दिला. सुरुवातीला मी निर्माता होतो. पण, तेंडुलकर आणि अरिवद यांच्या आग्रहामुळे मी या नाटकात सुमंत ही भूमिका केली. दुसरा अंक लिहून होईपर्यंत मी दररोज तेंडुलकर यांच्या घरी जाऊन बसायचो. स्पर्धेतील प्रयोगाची तारीख अगदी जवळ येऊन ठेपली होती. तेंडुलकर यांच्या ज्येष्ठ बंधूंच्या निधनानंतर अंत्यसंस्कार आटोपले आणि सायंकाळी तालमीच्या ठिकाणी आलेल्या तेंडुलकर यांना आम्ही शाळेच्या खोलीत कोंडून ठेवले. तासाभरात दुसरा अंक आणि बेणारेचे स्वगत झाल्याचे तेंडुलकर यांनी सांगितल्यानंतरच बाहेरून कडी उघडली गेली. बेणारेचे हे स्वगत रंगभूमीवरील ऐतिहासिक स्वगत झाले आहे. या नाटकाला कमलादेवी चटोपाध्याय पुरस्कार लाभला. शंभू मित्रा यांनी बंगालीमध्ये तर, सत्यदेव दुबे यांनी हिंदूीमध्ये नाटक आणि चित्रपट केला. या नाटकाचे ‘रंगायन’ने शंभर तर, रोहिणी हट्टंगडी यांना घेऊन ‘आविष्कार’ने नव्वद प्रयोग केले, असेही अरुण काकडे यांनी सांगितले.
‘शांतता’ची विविध रूपे
- मराठी चित्रपट – ‘शांतता कोर्ट चालू आहे’ – दिग्दर्शक- सत्यदेव दुबे, कलाकार- सुलभा देशपांडे
- हिंदूी नाटक – ‘खामोश-अदालत जारी है’ – दिग्दर्शक- ओम शिवपुरी, प्रमुख भूमिका- सुधा शिवपुरी
- हिंदूी चित्रपट – ‘शांतता कोर्ट शुरू है’ – दिग्दर्शक- सत्यदेव दुबे, कलाकार- सुलभा देशपांडे, अरिवद देशपांडे, अमरीश पुरी, अमोल पालेकर, एकनाथ हट्टंगडी