‘वो ख्वाबों की शहजादी, वो तो हर दिल पे छायी..’ या ओळी बॉलिवूडच्या ‘हवा-हवाई’ला म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी यांना अगदी तंतोतंत लागू पडतात. सौंदर्य, अभिनय आणि नृत्याविष्काराच्या जोरावर श्रीदेवी यांनी लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण अवघ्या ५४ व्या वर्षी श्रीदेवी यांचे कार्डिअॅक अरेस्टमुळे झालेल्या निधनाने बॉलिवूडसह तमाम चाहत्यांच्या मनाला चटका लावून गेली. हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी श्रीदेवी यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड भाषेतील चित्रपटांत काम केलं. हिंदी चित्रपटात काम करताना सुरुवातीला त्यांना हिंदीचा एक शब्दही बोलता येत नव्हते, पण दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आणि बॉलिवूडची ‘चाँदनी’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

अभिनेते जितेंद्र यांनी ‘द प्रिंट’ या वेबसाइटला दिलेल्या एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली होती. ‘हिम्मतवाला’ या चित्रपटातील तिच्या अभिनयाचा आणि नृत्याचा उल्लेख करत त्यांनी म्हटले होते की, ‘तिला हिंदीत एक शब्दही बोलता येत नाही पण या चित्रपटानंतर ती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार हे नक्की!’

त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना श्रीदेवी फक्त हो किंवा नाही अशाचप्रकारे उत्तर देत होत्या. प्रसारमाध्यमांसमोर विशेष छाप न सोडल्याचा त्यांना काही फरक पडत नव्हता, कारण त्यांच्या अभिनयाला आणि कामाला प्रेक्षकांची दाद मिळत होती. हिंदी भाषा त्यावेळी त्यांना समजत नसली तरी कॅमेरासमोर अचूक हावभाव कसे द्यायचे हे त्यांना ठाऊक होते. कॅमेराला सामोरे जात असताना त्यांच्यात कमालीचा आत्मविश्वास असायचा. कित्येकदा दिग्दर्शकांना एखादे दृष्य तिला समजावल्यानंतर तिला ते कळले की नाही याचाच अंदाज लागत नसे असे म्हटले जाते. कारण त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर काहीच भाव नसायचे, पण कॅमेरा ऑन होताच त्या सर्वांची मनं जिंकून घेत.

PHOTOS: श्रीदेवीने नाकारले होते हे सुपरहिट सिनेमे

बऱ्याचदा सेटवर श्रीदेवी यांची बहिण श्रीलता त्यांच्यासोबत असायची. दिग्दर्शक जेव्हा एखादे सीन समजावून सांगायचे, त्यानंतर श्रीदेवी त्याच सगळ्या गोष्टी बहिणीला तमिळ भाषेत समजावून सांगत असे. त्या बहिणीला का समजावून सांगत आहेत, असा प्रश्न अनेकांना पडायचा. पण कदाचित हीच त्यांच्या कामाची पद्धत होती, असे अनेकजण म्हणतात. अशाप्रकारे, त्यांनी बॉलिवूडला आपल्या कामाच्या जोरावर आपलेसे केले आणि बॉलिवूडच्या नभात ‘चाँदनी’ म्हणून आपले कायमचे स्थान निर्माण केले.

VIDEO: लग्नात नाचत असतानाचा श्रीदेवीचा अखेरचा व्हिडिओ व्हायरल