शिमगा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो कोकणी माणसाचा उत्साह. कोकणातील सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचं दर्शन घडवणारा हा सण. त्यामुळे कोणताली प्रत्येक माणूस या सणाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतो. कोकणी माणसाचा हाच उत्साह, या सणाची परंपरा लवकरच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अभिनेता भूषण प्रधान यांची मुख्य भूमिका असलेला ‘शिमगा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वी या चित्रपटातलं एक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.
‘शिमगा’ चित्रपटातलं ‘गुणगुणतंय’ हे नवीन गाणं प्रदर्शित झालं असून या रोमॅण्टीक गाण्यात भूषण आणि मानसी ही जोडी झळकली आहे. लग्न आणि लग्नानंतर नवरा-बायको यांच्यात खुलत जाणारं हळुवार प्रेम या साऱ्यावर या गाण्यात भाष्य करण्यात आलं आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून ‘त्या’ दोघांमधलं गोड नातं ते व्यक्त करत आहे. मानसीसाठी स्वत:च्या हाताने स्वयंपाक करणारा भूषण आणि आपण जेवणापूर्वी नवऱ्याला प्रेमाने भरवलेला घास हे लहान लहान क्षणही या गाण्यात उत्तमरित्या रेखाटण्यात आले आहेत.
या चित्रपटाच्या माध्यमातून मानसी पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. त्यामुळे पहिल्याच चित्रपटात रोमॅण्टीक गाणं शूट करताना मानसी प्रचंड नर्व्हस होती. मात्र भूषण आणि चित्रपट दिग्दर्शकांनी तिला यावेळी प्रचंड मदत केली.
दरम्यान, या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन दिपाली विचारे यांनी केले आहे. श्री केळमाई प्रोडक्शन निर्मित ‘शिमगा’ हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रदर्शित होणार असून या सिनेमाचे दिग्दर्शन निलेश कृष्णा यांनी केले आहे. या चित्रपटामध्ये राजेश शृंगारपुरे, भूषण प्रधान, कमलेश सावंत, मानसी पंड्या, विजय आंदळकर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.