चित्रसृष्टीतील गुंडगिरी

सेटवरची गुंडगिरी रोखण्यासाठी इंडस्ट्रीतून सध्या एकत्रितपणे प्रयत्न केले जात आहेत.

|| रेश्मा राईकवार

गेले दीड-दोन वर्ष करोना आणि टाळेबंदीमुळे ठप्प झालेली मनोरंजनसृष्टी पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असताना कलादिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येची घटना इंडस्ट्रीला जबरदस्त धक्का देऊन गेली. सेटवरची गुंडगिरी गेली कित्येक वर्ष राजरोसपणे सुरू आहे, मात्र त्याविषयी आवाज उठवण्याचा प्रयत्न करूनही काही हाती लागले नाही. आणि मग आपला वेळ फु कट घालवण्यापेक्षा त्यांना पैसे देऊन आपले काम कसे पूर्ण करता येईल, या प्रयत्नात हा प्रकार सगळ्यांच्या अंगवळणी पडत गेला. पण या गुंडगिरीमुळे आपल्यातीलच कोणी एकोने आयुष्यच संपवून टाकलं या घटनेने अस्वस्थ झालेले निर्माते, दिग्दर्शक, कामगार, तंत्रज्ञ मंडळी एकत्र आली आहेत. सध्या पोलीस आणि गृहमंत्री यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर कधी नव्हे ते या गुंडगिरीला रोख बसेल असे दिलासादायी चित्र निर्माण झाले असल्याची भावना मनोरंजनसृष्टीत व्यक्त होते आहे.

कलादिग्दर्शक राजू साप्ते यांच्या आत्महत्येनंतर अशा प्रकारची गुंडगिरी खपवून घ्यायची नाही, असा निर्धार कामगारांपासून निर्मात्यांपर्यंत सगळ्यांनी के ला. पूर्वी आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा आमचे सगळे कामगार हे मराठी असायचे. एखाद्दुसरा परप्रांतीय कामगार असायचा. सगळे मनापासून काम करायचे. आता मात्र हे चित्र उलट झाले आहे. आता आमच्याकडे काम करणारे जवळपास सगळेच कामगार हे परप्रांतीय आहेत. हे परप्रांतीय कामगार या वेगवेगळ्या मजदूर युनियनशी बांधले गेले आहेत. या कामगारांना थेट वेतन द्यायचे नाही, संबंधित युनियनच्या माध्यमातून द्यायचे हा अलिखित नियम आहे. कामगारांच्या वेतनातून काही टक्के  दलाली या युनियन्सचे पदाधिकारी वसूल करतात. कामगारांच्या कितीही अडचणी असल्या तरी त्यांना थेट पैसे दिले जाऊ शकत नाहीत. एखाद्याने तसे के ल्यास त्याच्याकडून मोठय़ा रकमेची मागणी के ली जाते अथवा कामगारांना काम करू दिले जात नाही, अशी माहिती कलादिग्दर्शक संतोष फु टाणे यांनी दिली. अनेकदा कोणी पैसे न दिल्यास त्यांच्या सेटची तोडफोड के ली जाते. अशा वेळी आपला वेळ आणि पैसा वाया जाईल या भीतीपोटी निर्मात्यांपासून अनेकजण युनियन्सच्या लोकांना पैसे देतात. मात्र आता तसे होणार नाही, अशी माहिती निर्माते नितीन वैद्य यांनी दिली.

सेटवरची गुंडगिरी रोखण्यासाठी इंडस्ट्रीतून सध्या एकत्रितपणे प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून शिवसेना चित्रपट सेनेचे अध्यक्ष आंदेश बांदेकर यांच्या पुढाकाराने निर्माते, तंत्रज्ञ यांची मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याबरोबर बैठक झाली. त्यापाठोपाठ गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबरोबरही मनोरंजनसृष्टीतील मान्यवरांची बैठक झाली. या बैठकीत गुंडगिरी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत, एवढेच नाही तर त्यादृष्टीने पोलीस आयुक्तांनी दिलेल्या आश्वासनानुसार सेटवर यापुढे अशा प्रकारे गुंडगिरी होणार नाही यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती नितीन वैद्य यांनी दिली. ‘ज्या ज्या परिसरात चित्रीकरणं सुरू आहेत तेथील पोलीस अधिकारी आणि मराठी-हिंदीतील ३५ निर्माते, इम्पासारख्या संघटनांचे प्रमुख यांचा व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून कोणत्याही सेटवर असा प्रकार झाल्यास त्याची तत्काळ दखल पोलिसांकडून घेतली जाईल, कारवाई  के ली जाईल. अशा पद्धतीने राज्यभरातील महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत या गुंडांवर कारवाई करण्याचे थेट आदेश पोहोचले आहेत. आत्तापर्यंत ही प्रकरणे उजेडात आली नव्हती, मात्र साप्तेंच्या आत्महत्येनंतर या प्रकरणांमध्ये दोषी असलेल्यांना पकडण्यासाठी पोलीस हात धुऊन त्यांच्या मागे लागले आहेत. मनोरंजन उद्योग हा राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि या उद्योगासाठी सुरक्षा कवच निर्माण झाले पाहिजे, असा संदेश पोलिसांपर्यंत पोहोचला आहे. पहिल्यांदाच राज्य सरकार ठामपणे इंडस्ट्रीच्या मागे उभे राहिले आहे हे चित्र आश्वासक आहे’, अशी भावना वैद्य यांनी व्यक्त के ली. यापुढे निर्मातेही अशा काही घटना घडल्यास गप्प राहणार नाहीत, ते स्वत:हून पोलीस ठाण्यात तक्रार करतील. या गुंडांना कायमचा आळा बसावा या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील, याचा विचार निर्मात्यांच्या संघटनांकडूनही के ला जात असून लवकरच त्यासंदर्भात बैठक होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट के ले.

‘यापुढे सुरक्षित अशा वातावरणात आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रात चित्रीकरण करता येईल असे आशेचे चित्र निर्माण झाले आहे. सगळ्या घातक-विघातक लोकांचा जाच, मग ते युनियनशी संबंधित असो किंवा इतर, लवकर संपेल अशा प्रकारचे आदेश पोलीस प्रमुखांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिले आहेत. एक युनियनचा माणूस म्हटलं की सगळं सोपं होतं, पण तेच एखाद्या व्यक्तीच्या नावाने बोललं गेलं तर घातक होतं हा आजवरचा इतिहास आहे.

अमूक  एक गुंड किंवा तमुक एखादा अधिकारी त्रास देतो असं म्हटलं तर पुढे त्या अनुषंगाने येणारी संकटंही निर्मात्यांना किंवा तंत्रज्ञांना झेलावी लागतात. या संकटाचा बीमोड करण्यासाठी विशेष काळजी घेतली जाईल असं आश्वासनही पोलीस प्रमुखांनी दिलं. गुप्तता राखून अत्यंत कडक कारवाई होईल असे सांगण्यात आले आहे. याबद्दलची विस्तृत माहिती आदेश बांदेकर देतीलच. ५ रुपयांची गोष्ट २५ रुपयांना द्यावी लागणे आणि तीही निकृष्ट दर्जाची कारण या लोकांची दहशत हा भागही या चर्चेत घेतला गेला. या होकारार्थी प्रयोगाची अंमलबजावणी होवो आणि ती निरंतर सुरू राहो एवढीच शासनाकडे प्रार्थना’, अशी भावना निर्माता-दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांनी व्यक्त केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shiv sena chitrapat sena president adesh bandekar lockdown corona virus movie crime entertainment akp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या