वाफाळत्या कॉफीचा घोट आणि त्याचा अद्भुत सुगंध प्रत्येकाचा दिवस रम्य करून टाकत असतो. जवळपास सगळ्यांच्या आयुष्यात कॉफी ही महत्त्वाची असते. आता मराठी चित्रपटसृष्टीमधील सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशीचा ‘कॉफी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हा चित्रपट १४ जानेवारीला चित्रपगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘तन्वी’ फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले असून कैलास सोरारी आणि विमला सोरारी या चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रेमाचे वेगवेगळे अनुभव प्रत्येकजण घेत असतो. अशाच काहीशा कटू-गोड अनुभवाच्या प्रेमाची लज्जतदार गोष्ट ‘कॉफी’ चित्रपटात पहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटाच्या आकर्षक पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

चित्रपटाची कथा-पटकथा मच्छिंद्र बुगडे यांची असून संवाद मच्छिंद्र बुगडे आणि नितीन कांबळे यांनी लिहिले आहेत. संकलन राहुल भातणकर यांनी केले असून छायांकन आय गिरिधरन यांनी केले आहे. गीते अशोक बागवे, नितीन कांबळे यांनी लिहिली आहेत. संगीत तृप्ती चव्हाण यांचे आहे. कलादिग्दर्शन हरीश आईर यांचे आहे. कार्यकारी निर्माते संजय कांबळे आहेत.