दिलीप ठाकूर
आजच्या डिजिटल पिढीला सिमी गरेवाल म्हणजे, एका उपग्रह वाहिनीवर अतिशय शुभ्र वस्रात, कमालीच्या टापटीपपणे, हसतखेळत प्रश्न विचारत मोठ्या(च) स्टार्सच्या मुलाखती घेणारी स्टार इतकेच माहित असेल कदाचित. तर सिमी गरेवाल म्हणताच साठ-सत्तरच्या दशकातील चित्रपट रसिकांना ‘मेरा नाम जोकर’, ‘सिध्दार्थ’, ‘साथी’, ‘हाथ की सफाई’, ‘नमक हराम’ हे चित्रपट आठवले असतील. काहीना तर ‘जोकर’, ‘सिध्दार्थ'(इंग्रजी) या चित्रपटात पटकथेनुसार तिने अर्धनग्न-नग्न दृश्य दिल्याची धिटाई आठवली असेल. त्यावरुन त्या काळात केवढा तरी गदारोळ उठला. पण त्यात अश्लिल असे काहीही नव्हते म्हणून वातावरण शांत झाले.
पण ह्याच सिमी गरेवालची चक्क चित्रपट दिग्दर्शिका ही ओळख वा माहिती तशी दुर्मिळच. तिने दिग्दर्शित केलेला ‘रुखसत’ (१९९३)चा मुहूर्त, पहिले चित्रीकरण सत्र सगळेच कसे उत्स्फूर्त होते, एक अभिनेत्री दिग्दर्शनात पाऊल टाकते हे तसे दुर्मिळच. त्यात सिमी गरेवालसारखी राज कपूर, ह्रषिकेश मुखर्जी, श्रीधर, प्रकाश मेहरा अशा मान्यवर दिग्दर्शकांच्या चित्रपटातून भूमिका करण्याचा अनुभव असणारी अभिनेत्री दिग्दर्शन करतेय म्हटल्यावर कौतुक व कुतूहल हवेच .
‘रुखसत’साठी अमेरिकेतील सुथा पिक्चर कॉम्बिनेशन ही निर्मिती संस्था निर्माता म्हणून लाभली ही खूपच मोठी सपोर्ट सिस्टम. पण म्हणून सगळेच कसे आलबेल होईलच असे चित्रपटाच्या जगात नसतेच. चित्रपटाचा नायक मिथुन चक्रवर्ती एकाच वेळेस अनेक चित्रपटातून बिझी असल्याने त्याच्या तारखा तर मिळायला हव्यात. त्या मिळाल्या की नायिका अनुराधा पटेलच्याही तारखा हव्यात. सगळेच लांबत गेले. संगीतकार कल्याणजी आनंदजी यांजकडून किशोरकुमार व साधना सरगमच्या आवाजात सगळी गाणीही एकेक करून ध्वनिमुद्रित करण्यात आली. हे सगळेच होईपर्यंत पटकथेत काही फेरफार करून चित्रपट पूर्ण करण्याची कुजबुज होती. एव्हाना सिमी गरेवालचा दिग्दर्शन उत्साह तो कितीसा राहिला हा प्रश्नच होता म्हणा आणि मग चित्रपट पाहिल्यावर लक्षात आले की खूपच अडथळ्यांना सामोरे जात जात हा चित्रपट पडद्यावर एकदाचा आलाय. काही काही दृश्यात मिथुनचे रुपडे चक्क जुने दिसले. हे म्हणजेच चित्रपट रखडून पूर्ण झाल्याच्या खुणा असतात. काही असो. सिमी गरेवालने ‘रुखसत’ या एकाच का होईना पण चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या आठवणीने ती सुखावेल की तिला ही आठवणच नकोशी वाटेल, कोण जाणे?