प्रसिद्ध गायिका आशा भोसले सध्या गाण्यांच्या मैफलीसाठी न्यूयॉर्कमध्ये असून,तेथे त्यांचा ८२ वा वाढदिवस साजरा झाला. त्यांनी हितचिंतकांचे आभार मानले आहेत. आशा भोसले यांनी ट्विटरवर म्हटले आहे, की वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानते. नुकतीच न्यूयॉर्कमध्ये आले आहे. तुम्ही दिलेले प्रेम व सदिच्छांबद्दल पुन्हा एकदा आभार. न्यूजर्सी येथे १३ सप्टेंबरला कार्यक्रम होणार आहे त्याबाबत उत्सुकता आहे.
गेली सहा दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांनी आपल्या भगिनी लता मंगेशकर यांचेही आभार मानले आहेत. दीदींचा आशीर्वाद नेहमीच आपल्याला आहे, या वेळी आपण अमेरिकेत आहोत त्यामुळे जरा वेगळे वाटते आहे. लतादीदींचा पाठिंबा व मार्गदर्शन अमूल्य आहे, असेही आशा भोसले म्हणतात. आशा भोसले यांनी चाळीसच्या दशकात पाश्र्वगायन सुरू केले. ओ. पी. नय्यर, सचिन देव बर्मन, आर. डी. बर्मन, खय्याम, बाप्पी लाहिरी यांच्या संगीत दिग्दर्शनात त्यांनी काम केले. उडत्या चालीची गीते त्यांनी सादर केली. हिंदी चित्रपटात त्यांनी झुमका गिरा रे, रात अकेली हैं, आजा आजा, दम मारो दम, दिल चीज क्या हैं ही गाणी सादर केली. नंतरच्या काळात त्यांनी ए. आर. रेहमान व अन्नू मलिक यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली बाजीगर, रंगीला, ताल या चित्रपटांना स्वरसाज दिला. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ब्रेट ली, रवीना टंडन, मिका सिंग यांनी आशा भोसले यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ब्रेट ली याने म्हटले आहे, की तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! ब्रेट ली याने २००६ मध्ये आशा भोसले यांच्या समवेत ‘मैं तुम्हारा हूँ’ हे गीत ध्वनिमुद्रित केले होते. रवीना टंडन यांनी म्हटले आहे, की आशा भोसले यांची गीते ऐकतच आमची पिढी मोठी झाली. त्यांनी यापुढेही प्रदीर्घ काळ रसिकांना हा आनंद द्यावा.