करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या प्राणघातक विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या यादीत आता आणखी एका गायकाची भर पडली आहे. प्रसिद्ध अमेरिकन गायक ख्रिस ट्रोसडेल याचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तो ३४ वर्षांचा होता. करोनाची लागण झालेल्या ख्रिसला २१ मे रोजी कॅलिफोर्नियातील रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. १२ दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. परंतु त्याचं शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. अखेर दोन जूनला ख्रिसची प्राणज्योत मालवली.

ख्रिस ट्रोसडेल अमेरिकेतील एक प्रसिद्ध गायक, संगीतकार होता. बायबँड या प्रसिद्ध म्युझिक ग्रुपमधून त्याने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ‘इट हँपन एव्हरी टाईम’, ‘डान्स फॉर लव्ह’, ‘गॉट गेट द गर्ल’, ‘विथ ऑल माय हार्ट’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी त्याने गायली आहे. गाण्यासोबतच तो अभिनयक्षेत्रातही कार्यरत होता. ‘डेज ऑफ आर लिव्ह्स’, ‘शेक इट अप’, ‘ऑस्टिन अँड अॅली’, ‘लुसिफर’ यांसारखा काही टीव्ही मालिकांमध्येही त्याने काम केले होते. ख्रिसच्या मृत्यूमुळे अमेरिकन संगीतक्षेत्रात शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे.