आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे सावनी रविंद्र. आपल्या मधूर आवाजाने सावनीने मराठी कलाविश्वात एक दबदबा निर्माण केला आहे. आजवर सावनीने अनेक चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे. तसंच ती सावनी अनप्लग्ड हा कार्यक्रमदेखील करत आहे. विशेष म्हणजे श्रोत्यांच्या आणि चाहत्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर तिच्या सावनी अनप्लग्डचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

‘इतना शोर शराबा क्युँ हैं’, या गझलने तिच्या तिसऱ्या पर्वाची सुरुवात झाली आहे. वैभव जोशी यांनी ही गझल लिहिली असून दत्तप्रसाद रानडे यांनी ती संगीतबद्ध केली आहे. त्यातच सावनीचा गोड आवाज या गझलला लाभला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या नव्या पर्वाची चर्चा सुरु आहे.


“सावनी अनप्लग्डची दोन्ही पर्व एवढी गाजली की, सातत्याने मला सावनी अनप्ल्ग्डच्या तिस-या पर्वाची विचारणा होत होती. म्हणून जागतिक संगीत दिनाचे निमित्त साधून तिसरे पर्व घेऊन यावे असे वाटलं. माझ्याच ‘मेरे हिस्से का चांद’ या अल्बममधलं हे ‘इतना शोर शराबा क्युँ हैं’ गाणं आहे. या गाण्याची जादू जागतिक संगीत दिनी रसिकांनी अनुभवावी म्हणून या गाण्याने नवे पर्व सुरू केले आहे. आता दर आठवड्याला तिस-या पर्वातली अनप्लग्ड गाण्यांची श्रवणीय सीरिज घेऊन यायचा मानस आहे,” असं सावनी म्हणाली.

दरम्यान, सावनी ही लोकप्रिय गायिका असून तिची तरुणांमध्ये विशेष क्रेझ आहे. सावनीने मराठीसह तेलुगू, मल्याळम, कन्नड, तामिळ भाषेतूनही अनेक गाणी गायली आहेत. काही काळापूर्वी तिच्या ‘वेन्निलविन सालईगलिल’ या गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळाले होता. तिने ‘पसंत आहे मुलगी’, ‘कमला’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ आदी मालिकांची शीर्षकगीतं गायली आहेत.