प्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा आणि गायक सोनू निगम ट्विटरवरील वादामुळे नेहमीच चर्चेत असतात. ८ मार्चला जागतिक महिला दिनानिमीत्त सोना एक शोमध्ये परफॉर्म करणार होती. पण ऐनवेळी सोनाचा परफॉर्मन्स रद्द करून कैलाश खेरला बोलवण्यात आलं होतं.

सोना मोहपात्राने या विषयी सोनू निगमवर ट्विटरव्दारे टीका केली आहे. ‘गेल्या तीन महिन्यात माझा शो तीन वेळा रद्द करण्यात आला हे सोनू निगम सह इतर पुरुष कार्यकर्त्यांना ऐकून आनंदच होत असेल. तसेच शोमध्ये माझ्या ऐवजी कैलाश खेरला घेण्यात आलं’ असं सोना मोहपात्राने ट्विट केलं आहे.

सोनाने गेल्या वर्षी #MeToo चवळवळीव्दारे कैलाश खैर आणि अनु मलिकवर गैरवर्तनाचा आरोप केला होता. परंतू सोनू निगमने अनु मलिकाच्या बाजूने बचावपूर्ण विधान करत सोनाला विरोध केला होता. त्यानंतर आणखी एक महिलेने कैलाश खेर यांच्यावर गैरवर्तानाचा आरोप केला होता.

काही दिवसांपूर्वीच सोना मोहपात्राने ट्विटरव्दारा सलमान खानवरही राग व्यक्त केला होता. ‘प्रिय ट्विटर, मी या व्यक्तीला फॉलो करत नाही. तुम्हाला विनंती करते की कृपया तुमचे अल्गोरिदम एकदा तपासा आणि या व्यक्तीचे जाहिरातपर ट्विट माझ्या टाइमलाइनवर दाखवू नका’असं तिनं लिहिलं होतं.