मशिदीमध्ये होणाऱ्या अजानमुळे गायक सोनू निगमला जरी त्रास होत असला आणि त्याने या सर्व प्रकाराला गुंडगिरी, धार्मिक बळजबरीचे नाव दिले असले तरीही काही कलाकारांना मात्र अजान किंवा मग मंदिर, गुरुद्वाऱ्यामध्ये होणाऱ्या प्रार्थनांचा घोष या साऱ्याचा काहीच त्रास होत नाही. किंबहुना हे कलाकार त्या प्रार्थनांची वाट पाहात असतात. सोनू निगमच्या अजान विरोधातील ट्विटनंतर अभिनेत्री पूजा भट्टने आपल्याला चर्चच्या घंटानादामुळे आणि मशिदीतील अजानमुळे जाग येते असे म्हणत विविधतेतील एकतेला सलाम केला होता. तिच्यामागोमागच आता क्वांटिको गर्ल प्रियांका चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
साधारण वर्षापूर्वी चित्रीत झालेल्या या व्हिडिओमध्ये प्रियांका आपण अजानची आतुरतेने वाट पाहात असल्याचे सांगताना दिसते. ‘गंगाजल २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान प्रियांका भोपाळमध्ये गेली असतानाचा हा व्हिडिओ आहे. मुख्य म्हणजे सोनू निगम ट्विट प्रकरणी या व्हिडिओचा संबध जोडला जात आहे. ‘भोपाळमध्ये सर्वात सुंदर क्षण संध्याकाळच्या वेळी अनुभवता येतात. कारण त्यावेळी स्वर्गीय आनंद देणारी अजान कानांवर पडते. चित्रीकरणाचे काम झाल्यानंतर पॅकअप करुन मी घराच्या छतावर येते, जिथे एकाच वेळी मला जवळपास सहा मशिदींतील अजानचा आवाज ऐकू येतो. त्या पाच मिनिटांमध्ये एक वेगळीच शांतता असते.’ असे म्हणत प्रियांका या व्हिडिओमध्ये तिची अजानविषयीची ओढ व्यक्त करताना दिसतेय.
दरम्यान, सोनू निगमने अजान विरोधात सूर आळवत इतर धार्मिक स्थळांवर होणाऱ्या लाउडस्पीकरच्या आवाजावरही नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या त्याला अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सोनूने पुन्हा ट्विट करत त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. ‘माझे ट्विट वाचून ज्यांना माझे वक्तव्य मुस्लिम धर्माच्या विरोधात वाटते त्यांनी ही बाबही लक्षात घ्यावी की, मी ट्विटमध्ये मंदिर आणि गुरुद्वाऱ्यामध्ये होणाऱ्या मोठ्या आवाजांचाही उल्लेख केला होता. ही गोष्ट लक्षात का घेतली जात नाहीये?’, असा प्रश्नही त्याने ट्विटमधून उपस्थित केला आहे.
एका ट्विटमुळे सुरु झालेल्या या वादामध्ये आता अनेकांनी उडी घेतली असून काही सेलिब्रिटींनी सोनूची बाजू घेत त्याला पाठिंबा दिला आहे. ज्यामध्ये विवेक अग्निहोत्री, अपूर्वा असरानी यांचा समावेश आहे. तर, संगीतकार जोडी साजिद-वाजिद आणि अभिनेत्री पूजा भट्टने मात्र सोनूविरोधात नाराजीचा सूर आळवला आहे.