गायक आणि डॉक्टर अशी दुहेरी भूमिका निभावणाऱ्या उत्कर्ष शिंदे याने सामाजिक भान ठेवत कला क्षेत्रातील अत्यंत गरजू व्यक्तींना रेशन किटचं वाटप केलं आहे. यात कवी आणि गीतकार हरीनंद रोकडे यांना देखील त्याने मदत केली. हरीनंद रोकडे हे अंध असून त्यांनी प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने उत्कर्ष त्यांच्या मदतीला धावून गेला आणि तीन महिने पुरेल येवढे रेशन त्यांनी रोकडे यांना दिले.

पिंपरी-चिंचवड परिसरात कलेवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींच्या मदतीला गायक उत्कर्ष शिंदे नेहमीच धावून गेला आहे. त्याने शहरातील ४५० गरजू कलाकार कुटुंबाना मदत केली आहे. स्वतः त्याने त्यांच्यापर्यंत रेशन पोहचवलं आहे. ‘स्वर सम्राट चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून त्याने ही मदत केल्याच सांगितलं आहे. तसेच सातारा, सांगली आणि कराड या परिसरातील स्थानिक कलाकारांना देखील तो अशी मदत करणार आहे.

दरम्यान, प्रल्हाद शिंदे आणि आनंद शिंदे यांच्यासोबत काम केलेले कलाकार हरीनंद रोकडे हे अंध असल्याने वर्तमानपत्र, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील आधारित पुस्तक इतरांना वाचायला लावून ते ऐकूण त्यांच्यावर त्यांनी गीतं लिहिलेली आहेत. यात भक्ती गीतं, पोवाडे, भीम गीतांचा समावेश आहे. ही गाणी प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे यांनी गायलेली आहेत. तर शिंदे घराण्याच्या तिसऱ्या पिढीतील आदर्श आणि उत्कर्ष शिंदे हे देखील त्यांनी लिहिलेली गीतं गात असल्याचं उत्कर्षने लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना सांगितले.