गायन मैफिलीमध्ये संगतकार ही त्यांची ओळख. पण, उजवीकडे आणि डावीकडे बसणारे हे वादक मैफिलीमध्ये गायकाच्या स्थानावर बसले आणि  या संगतकारांच्या गायकीचा स्वर‘साज’ अनुभवत रसिकांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. ज्येष्ठ गायक स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ‘संगत संगीत’ कार्यक्रमात प्रसिद्ध संवादिनीवादक सुयोग कुंडलकर, प्रसिद्ध तबलावादक भरत कामत आणि रामदास पळसुले यांच्या गायकीने रंग भरला.

त्यांना मिलद कुलकर्णी यांनी संवादिनीची आणि महेश देसाई यांनी तबल्याची साथसंगत केली. ज्येष्ठ गायिका पद्मा तळवलकर, आरती अंकलीकर-टिकेकर, शौनक अभिषेकी आणि रघुनंदन पणशीकर हे मान्यवर कलाकार आपल्या संगतकारांची मैफल ऐकण्यासाठी श्रोत्यांमध्ये उपस्थित होते. प्रसिद्ध अभिनेत्री विभावरी देशपांडे यांनी या मैफिलीचे निवेदन करताना या कलाकारांशी संवाद साधला. दीड तप तबल्याची साथसंगत करणारे भरत कामत यांनी पं. भीमसेन जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सुयोग कुंडलकर यांनी ‘भीमपलास’ रागगायनानंतर ‘अब तुमी सो लगन लागी’ ही ‘गोरखकल्याण’ रागातील बंदिश आणि त्याला जोडूनच पं. वसंतराव राजूरकर यांनी शिकविलेला तराणा सादर केला. भरत कामत यांनी ‘श्याम बजाए आज मुरलीया’ ही ‘यमन’ रागातील बंदिश आणि  ‘लागी करेजवा कटार’ ही ठुमरी सादर केली. ‘राम का गुणगान करीये’, ‘आरंभी वंदिन अयोध्येचा राजा’ आणि ‘आम्हा न कळे ज्ञान’ ही भजनांची मालिका सादर करीत कामत यांच्या मैफलीची सांगता झाली. रामदास पळसुले यांनी ‘मालकंस’ रागाचे सौंेदर्य उलगडले आणि भैरवीने त्यांनी मैफिलीचा समारोप केला.