स्लॅम पोएट्री आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध असणारा शामिर रुबेन सध्या चांगलाच अडचणीत आला आहे. काही दिवसांपूर्वी ज्या शामिरच्या कवितांची सोशल मीडियावर वाहवा होत होती, त्याच शामिरवर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात येत आहेत. मुंबईत विविध कॅफे आणि कॉर्पोरेट इव्हेंट्समध्ये शामिर आपल्या परफॉर्मन्सने अनेकांची मनं जिंकतो. पण, त्याच्याविषयीच्या सध्या रंगणाऱ्या चर्चा पाहता एका क्षणात त्याच्या या लोकप्रियतेचं रुपांतर द्वेषात झालं आहे. काही तरुणींना अश्लील मेसेज पाठवण्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शामिरच्या या कृत्याविषयीची माहिती कवयित्री सकिना बूटावालाने तिच्या फेसबुक पोस्टमधून दिली. शामिरविषयी तिने काही गोष्टी उघड करत लिहिलं, ‘महिला सबलीकरण, समानता आणि अशा बऱ्याच आधुनिक विचारसरणीकडे झुकणाऱ्या विषयांवर आपलं मत मांडणाऱ्या मुद्द्यांवर भाष्य करणारा एक प्रसिद्ध चेहराच (शामिर) एक भक्षक आहे. अल्पवयीन मुलींना अश्लील मेसेज पाठवणं, त्यांच्यावर अश्लील छायाचित्र पाठवण्यासाठी जबरदस्ती करणं, ही अशी कृत्य तो करतो.’ शामिरविरोधात लिहिणारी आणि त्याच्या कृत्यांविषयी हा खुलासा करणारी सकिना पहिलीच. तिची ही पोस्ट वाचल्यानंतर शामिरने ज्या तरुणींशी गैरबर्तन केलं होतं, त्यांनीसुद्धा पुढे येत आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार उघड केला.

शामिरने आपल्याला अश्लील मेसेज पाठवले तेव्हा आपण अल्पवयीन असल्याचंही तिने म्हटलं. ‘त्यावेळी हे सर्व काय सुरु होतं, हेच मला कळेना. मला त्याच्याशी बोलतानासुद्धा संकोचल्यासारखं वाटत होतं. त्यामुळे मग मीच त्याच्याशी न बोलण्याचा निर्णय घेतला’, असंही तिने या पोस्टमध्ये लिहिलं. त्यासोबतच तिने काही स्क्रीनशॉट्सही शेअर केले. ज्यामध्ये काही तरुणींनी शामिरने केलेल्या गैरवर्तणुकीविषयीचा खुलासा केला.

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

सकिनाच्या या पोस्टनंतर शामिरने आपल्याकडून झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पण, त्यासोबतच काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने सांगण्यात आल्याचा खुलासा फेसबुक पोस्टच्याच माध्यमातून केला. ‘मी ज्या तरुणींना, महिलांना मेसेज पाठवत होतो, त्या माझ्या मैत्रीणी होत्या, माझ्या ओळखीतील होत्या. आजही ते मेसेजेस वाचले तर चुकीचे वाटतील. पण, कोणत्याही महिलेला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता आणि नसेल’, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं. सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर उघड झालेला हा प्रकार पाहता आता याला कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Slam poetry artist shamir reuben accused of sexual misconduct by multiple women facebook post
First published on: 09-02-2018 at 09:55 IST