या वर्षीचा पहिला ‘स्वर्गीय स्मिता पाटील स्मृती पुरस्कार २०१७’ ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांना आणि पहिला ‘स्वर्गीय स्मिता पाटील कौतुक पुरस्कार २०१७’ अभिनेत्री अमृता सुभाष यांना जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी १६ तारखेला दीनानाथ नाट्यगृहात हा सोहळा पार पडणार आहे.
हरहुन्नरी कलाकार स्मिता पाटील यांच्या अभिनयाचे आजही शेकडो चाहते आहेत. स्मिता यांच्या आठवणींना स्मरुण त्यांच्या चाहत्यांनी एकत्र येऊन या वर्षीपासून पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.

आमदार अॅड. पराग अळवणी, आर्च एंटरटेनमेन्टचे विनीत व अर्चना गोरे, ‘जीवनगाणी’चे प्रसाद महाडकर आणि स्मिता यांची जवळची मैत्रीण ललिता ताम्हणे यांनी एकत्र येऊन हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगितले. बुधवारी स्मिता पाटील यांच्या ३१व्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी ही घोषणा केली.

smita patil

पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर स्मिताच्या स्मृतीखातर जीवनगाणीने खास निर्माण केलेला मूर्तीमंत ‘अस्मिता’ हा रसिकमान्य कार्यक्रम सादर केला जाईल. या कार्यक्रमाचे निवेदन तुषार दळवी आणि मधुरा वेलणकर करणार असून सरिता राजेश, अर्चना गोरे, सोनाली कर्णिक आणि मंदार आपटे हे गायक कलाकार गायन सादर करणार आहेत.