Smriti Irani Parents Divorce : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या त्यांच्या कामामुळेच कायमच चर्चेत असतात. छोट्या पडद्यावरील आदर्श सून म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. अभिनयक्षेत्रात उत्तम काम केल्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केला. राजकारणात सक्रिय झाल्यानंतर आता त्या देशाच्या महिला व बालविकास मंत्री आहेत. स्मृती इराणी यांचा जन्म २३ मार्च १९७६ रोजी दिल्लीमध्ये झाला. त्यांचे वडील पंजाब तर आई आसामची आहे. आता स्मृती यांनी जवळपास ४० वर्षांनी मोठा खुलासा केला आहे.
स्मृती सात वर्षांच्या असतानाच त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. आता ४० वर्षांनंतर त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत खुलेपणाने भाष्य केलं आहे. ‘एबीपी न्यूज’च्या वृत्तानुसार स्मृती यांनी निलेश मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं. आई-वडिलांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला असल्याचं स्मृती यांनी सांगितलं.
आणखी वाचा – Video : राखी सावंतने उडवली मलायका अरोराच्या चालण्याची खिल्ली, व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
काय म्हणाल्या स्मृती इराणी?
त्या म्हणाल्या, “माझ्या आई-वडिलांनी जेव्हा लग्न केलं तेव्हा त्यांच्याजवळ फक्त १५० रुपये होते. लेडी हार्टिंग्स रुग्णालयामध्ये माझा जन्म झाला. गुडगांवमध्ये आम्ही स्थायिक झालो. कारण तिथे राहणं आमच्यासाठी अधिक खर्चिक नव्हतं. माझ्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला आहे हे सांगण्यासाठी मला ४० वर्ष लागली. जेव्हा माझे आई-वडील एकमेकांपासून विभक्त झाले तेव्हा लोक आमचा द्वेष करत होते”.
“१०० रुपयांमध्ये घर खर्च चालवणं, आम्हाला सगळ्यांना सांभाळणं किती कठीण होतं हे आता मला समजत आहे. माझे वडील आर्मी क्लबच्या बाहेर पुस्तकं विकायचे. तेव्हा मी त्यांच्याजवळ बसायचे. माझी आई घरोघरी वेगवेगळे मसाले विकायची. माझ्या वडिलांनी शिक्षण घेतलं नव्हतं. पण आई पदवीधर होती. शैक्षणिक फरक हा माझ्या आई-वडिलांमधील एक वादाचा विषय होता”. स्मृती यांनी अगदी खुलेपणाने त्यांच्या आयुष्याबाबत यावेळी सांगितलं.