जेएनयू विद्यापीठ संकुलात १ आणि ४ जानेवारी रोजी झालेल्या तोडफोड प्रकरणाचा अनेक बॉलिवूड कलाकारांनी निषेध केला. त्यानंतर आता मराठी कलाकार सोनाली कुलकर्णी हिने ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारला सणसणीत टोला लगावला आहे. 'आपल्या देशातील विद्यार्थ्यांना वाचवू शकत नाही आणि यांना दुसऱ्या देशातील अल्पसंख्याकांना संरक्षण द्यायचे आहे', असं ट्विट सोनालीने केलं. #irony हा हॅशटॅग वापरत सोनालीने सरकारच्या धोरणांमधील विरोधाभासाला अधोरेखित केले आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यावरूनही सोनालीने सरकारवर निशाणा साधला. Can’t protect students in your own country and want to protect minorities from other countries!!!! #Irony #JNUViolence #jnuwewithyou — Sonalee (@meSonalee) January 7, 2020 दीपिकाचा पाठिंबा अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने जेएनयूतील हल्ल्याप्रकरणी निषेध नोंदविला आहे. मंगळवारी सायंकाळी तिने जेएनयू विद्यापीठाला भेट दिली आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. या हल्ल्यानंतर कलाकारांनी या घटनेचा निषेध केला आणि मोदी सरकारवर जाहीर टीकाही केली. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करण्यात आले. तेथे सिनेसृष्टीतील दिग्दर्शक, कलाकार सहभागी झाले होते. तोडफोडप्रकरणी नोंदविण्यात आलेल्या दोन एफआयआरमध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या नेत्या आइशी घोष यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. संकुलात ५ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात घोष जखमी झाल्या होत्या. पोलिसांनी रविवारी रात्री दोन एफआयआर दाखल केले. हिंसाचारप्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला असला तरी पोलिसांनी याप्रकरणी अद्याप एकाही व्यक्तीला अटक केलेली नाही.