मराठी रंगभूमीचे नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपटाच्या रुपाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात कलाकारांनीच दिग्गज कलाकार उभे केले आहेत. मराठी कलाविश्वात एक काळ गाजवणारे काशिनाथ घाणेकर यांच्या प्रवासात त्या काळच्या इतरही लोकप्रिय कलाकारांच्या भूमिका होत्या. त्याच भूमिका उलगडण्यासाठी अभिनेता सुमीत राघवन आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांचीही वर्णी लागली आहे. रुपेरी पडद्यावर आईच्या भूमिकेला न्याय देणाऱ्या आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ् अभिनेत्री सुलोचना दीदी यांची व्यक्तीरेखा सोनाली साकारत आहे. ही भूमिका साकारणं म्हणजे स्वप्न सत्यात उतरल्यासारखं वाटत असल्याची प्रतिक्रिया सोनालीने दिली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सोनाली म्हणाली, ‘सुलोचनादीदींची भूमिका मिळाल्यावर बक्षिसांच्या पलीकडचा आनंद मला झाला. त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की माझी भूमिका साकारण्याची वेळ कधी आली तर ती सोनालीने साकारू दे. त्यामुळे माझ्यासाठी हे सगळं स्वप्नवत आहे. थोड्याशा काळासाठी का होईना मी ते आयुष्य जगले, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे.’

https://twitter.com/subodhbhave/status/1051379076806701056

यावेळी सोनालीने सेटवरचा एक मजेदार किस्सासुद्धा सांगितला. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी जेव्हा तिने सुबोध भावेला सेटवर मेकअपमध्ये पाहिलं तेव्हा ती थक्कच झाली. ‘सेटवर पहिल्या दिवशी मी चाचपडत होते. मेकअप व्यवस्थित आहे ना, पदर नीट घेतलाय ना याच विचारात होते आणि इतक्यात माझ्यासमोर सुबोध आला. मी माझ्या कोणत्याच सहकलाकाराकडे इतका वेळ कधीच पाहिलं नव्हतं. सुबोधकडे मी एकटक पाहतच राहिले. शेवटी मीच त्याला म्हटलं की तू आधी गॉगल लाव, कारण मी फक्त तुझी मैत्रीण आहे. एवढा वेळ मी तुझ्याकडे बघतेय ती आता मलाच संकोच वाटू लागला आहे. नंतर सेटवर एकेकजण भेटत गेले आणि प्रत्येकाचा लूक पाहिला की तिच माणसं परत आली की काय असं वाटलं,’ असं तिने सांगितलं.

https://twitter.com/subodhbhave/status/1039127975055085568

सोनालीचा सुलोचनादीदींचा लूक सध्या कलाविश्वात चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. १९६० च्या दशकावर आधारीत असलेल्या ‘आणि काशिनाथ घाणेकर’मध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा अभिनेता म्हणून झालेला उदय आणि अस्त दाखवण्यात येणार आहे. ८ नोव्हेंबरला हा बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.