बॉलीवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी पद्मावती चित्रपटाच्या सेटवर राजपूत करणी सेनेकडून हल्ला करण्यात आला. करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी सेटवर तोडफोड तर केलीच पण त्याचसोबत भन्साळी यांना मारहाणही केली. जयपूर येथील जयगडावर चित्रीकरण होत असलेल्या पद्मावती चित्रपटाची संपूर्ण टीम या घटनेनंतर मुंबईला परतणार आहे. तसेच, ही टीम पुन्हा कधीच जयपूरला चित्रीकरणासाठी जाणार नसल्याचे म्हटले जातेय. भन्साळींना करण्यात आलेल्या मारहाणीला बॉलीवूडकरांनी निषेध केला आहे. यासाठी संपूर्ण चित्रपटसृष्टी एकत्र आली आहे. मात्र, या सगळ्यात सोनम कपूर ही चर्चेत आली आहे.

सोनमने अगदी विचारपूर्वक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या प्रकरणात खेचत त्यांना त्यांच्याच ट्विटची आठवण करून दिली आहे. सोनम कपूरने नरेंद्र मोदी यांच्या एका ट्विटचा फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. या ट्विटमध्ये मोदींनी लिहिलेले की, कलेसाठी कोणतीही हद्द किंवा मर्यादा नसाव्यात. या ट्विटचा फोटो शेअर करत सोनमने लिहिले की, सर, मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छिते…. प्रजासत्ताक दिन होऊन काही दिवस उलटले नाहीत तोवर आमच्या इंडस्ट्रीला कामात व्यक्त होताना असा पाणउतारा सहन करावा लागत असेल तर हे खरंच खूप निराशाजनक आहे. कृपया आमच्यासाठी उभे राहा. सोनम कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या साँवरिया चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

दरम्यान, आशुतोष गोवारीकर, राम गोपाल वर्मा, करण जोहर, श्रेया घोषाल यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी संजय लीला भन्साळी यांच्यावरील हल्ल्याचा ट्विटरवरुन निषेध केला आहे. ‘राजस्थान पोलीस कुठे होती. लज्जास्पद.. याविरोधात काय केले जातेय? अशी लोकशाही काय कामाची,’ असे ट्विट गायिका श्रेया घोषाल हिने केले आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपने संजय यांच्या समर्थनात ट्विट केले. ‘जो सिनेमा अजून पूर्ण बनलाही नाही पण त्याची संहिता मात्र संपूर्ण जगाला माहित आहे आणि पुढे काय होणार हेही सगळ्यांना माहित आहे.’ पण त्याच्या या ट्विटवरही ट्रोल होताना दिसले. मात्र, अनुराग कश्यपने त्याच्या शैलीत या ट्रोलला उत्तर दिले. या घटनेनंतर संपूर्ण सिनेसृष्टीने एकत्र येणे गरजेचे आहे. या अशा घटनांना बळी पडता कामा नये. तसेच या करणी सेनेमुळे मला एक राजपूत असल्याची लाज वाटत आहे. कट्टर हिंदुत्ववादींनी आता ट्विटरमधून खऱ्या जगात पाऊल टाकले आहे. आता हिंदू दहशतवाद ही काही कल्पनेतील गोष्ट राहिलेली नाही, असे ट्विट अनुरागने केले होते.