गायक सोनू निगमने काही दिवसांपूर्वी मशिदीतील अजानविरोधात ट्विट करत आपण मुस्लिम नसूनही सकाळी अजानच्या आवाजाने जाग येते याबद्दल नाराजी व्यक्त करत एक ट्विट केले होते. त्यासोबतच सोनूने या सर्व प्रकाराला धार्मिक बळजबरीचे नाव दिले. या ट्विटनंतर सोनूच्या ट्विट्सना उत्तरं देत अनेकांनी त्याला धारेवर धरले. सोशल मीडियावरील या टिवटिवीमुळे सोनू निगमला काही धमक्याही देण्यात येत असल्याचे कळते. या सर्व प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत मुंबई पोलिसांनी त्याच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त केला आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू न देण्यासाठी ही काळजी घेण्यात येत असल्याचे समजते. अजानविरोधात केलेल्या ट्विटमुळे होणारा विरोध पाहता सोनू निगमच्या वर्सोवा येथील घराबाहेरील बंदोबस्तात वाढही करण्यात आल्याचे कळते. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरीही सोनूच्या ट्विटने अनेकांचाच रोष ओढवला आहे हेच खरे.
दरम्यान, सोनू निगमने अजानविरोधात हे ट्विट केल्यामुळे अनेकांनीच त्याच्यावर आगपाखड केली. ‘विविध धार्मिक रुढींना समजून त्यांचा आदर करायला शिक’, असा सल्ला सोनूला देण्यात आला. इतकच नव्हे, तर काही नेटिझन्सनी थेट शब्दांमध्ये ‘तुझ्यावर कोणी जबरदस्ती केली नाहीये. कानात कापूस घालून शांतपणे झोप…’ असे म्हणत सोनूला खडसावले.
काही सेलिब्रिटींनीही सोनूच्या या ट्विटवर नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. या सेलिब्रिटींमध्ये अभिनेत्री पूजा भट्ट, संगीतकार जोडी साजिद-वाजिद यांचा समावेश आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘ड्रग्जच्या नशेत धुंद असणाऱ्यांना कोणताही आवाज सहन होत नाही. सोनूसारख्या लोकांविषयी बोलण्यात काहीच अर्थ नाही.’ असे साजिद म्हणाला होता. तर वाजिदनेही त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन सोनू असे काही वक्तव्य करेल याची अपेक्षाही नव्हती असे म्हणत नाराजी व्यक्त केली. पूजा भट्टनेही तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन नाव न घेता सोनूवर शाब्दिक हल्ला चढवला. त्यामुळे आता या सर्व प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.