बॉलिवूड गायक सोनू निगम सध्या लॉकडाउनमुळे दुबईमध्ये अडकला आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. पण सोनू निगम जुन्या एका वादामुळे पुन्हा चर्चेत आहे. तसेच त्या वादावरुन सोशल मीडियावर सोनू निगमला आता अटक करण्याची मागणी केली जात आहे.

जवळपास ३ वर्षांपूर्वी सोनू निगमने अजान संबंधी एक ट्विट केले होते. तेव्हाच्या त्याच्या ट्विटचे स्क्रिन शॉट आता अचानक सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. अनेकांनी सोनू निगमला आता दुबईमध्ये अजानच्या आवाजाने त्रास होत नाही का? असा प्रश्न विचारला आहे. तसेच अनेकांनी जुना स्क्रिन शॉट शेअर करत बॉलिवूड गायक सोनू निगमला अजानच्या आवाजाचा त्रास होतो. तो सध्या दुबईमध्ये आहे तुम्ही त्याचा प्रश्न सोडवा असे म्हणत दुबई पोलिसांना टॅग केले आहे.

तर दुसऱ्या एका यूजरने सोनू निगमने धार्मिक भावना दुखावल्या असल्याचा आरोप करत त्याला अटक करण्याची मागणी केली आहे. या वादानंतर सोनू निगमने त्याचे ट्विटर अकाऊंट डिलिट केले असल्याचे म्हटले जात आहे. पण सोनूने तीन वर्षांपूर्वीच त्याचे अकाऊंट डिलीट केले आहे. त्यानंतर आजपर्यंत त्याने ट्विटवर पुन्हा पदार्पण केलेले नाही.

काय म्हणाला होता सोनू निगम?
सोशल मीडियावर शब्द जरा जपूनच वापरावेत याचा अंदाज सोनू निगमला आला असावा. कारण त्याच्या एका ट्विटने धार्मिक भावना दुखावल्याची प्रतिक्रिया अनेकांनी तीन वर्षांपूर्वी दिल्या होत्या. ‘देव सर्वांचं भलं करो. मी मुस्लिम नसूनही सकाळी अजानच्या आवाजानेच मला जाग येते. भारतात बळजबरीने चालणाऱ्या या धार्मिक रुढी कधी थांबणार?’ असे ट्विट त्याने केले होते.