काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद दलीप सिंह राणा अर्थात ‘द ग्रेट खली’ याच्या जालंधर रेसलिंग अकादमीत तो गेला होता. या ठिकाणी एक अशी घटना घडली की, ती पाहून उपस्थितांना आश्चर्य वाटले. अकादमीत सोनूने चक्क पाकिस्तानी पहिलवानासोबत दोन हात केले. त्याचे झाले असे की एक महिला आणि पुरुष पाकिस्तानचा झेंडा घेऊन रिंगमध्ये आले. रिंगमध्ये आल्यावर सोनूने त्या माणसाला चीतपट केले आणि त्याला रिंगच्या बाहेर फेकून दिले. त्यानंतर बुरखाधारी महिला रिंगमध्ये आली आणि तिने सोनू सूदला नाचण्याचा आग्रह केला. तिचा आग्रह सोनूने स्वीकारत त्या महिलेसोबत गाण्यावर थिरकलाही.

पण त्यानंतर सोनूने अकादमीतील पहिलवानांची आणि खलीची चौकशी केली आणि त्यांच्यासोबत वेळही घालवला. यावेळी सोनूने सांगितले की तो सिनेमांची निर्मिती करत असल्यामुळे खलीवर एखादा सिनेमा करायला त्याला नक्की आवडेल. त्याच्या या बोलण्यावर ग्रेट खलीही फार आनंदी झाला. ‘असं असेल तर मला पहिलवान न बोलता द ग्रेट खली हिरो म्हणा,’ असं खली आनंदाने म्हणाला. अनेक वर्षे ‘डब्ल्यूडब्ल्यूई’ गाजवल्यानंतर त्याने आता निवृत्ती घेतली आहे. पण कुस्तीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे अनेक खेळाडू तयार करण्यावर तो आता भर देणार आहे.