लॉकडाउनच्या काळात आणि त्यानंतरही अनेक गरजवंतांना मदतीचा हात देणारा अभिनेता सोनू सूद याची आता नवी ओळख बनली आहे. लोकांनी सोनूच्या दातृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक मंदिर उभारलं आहे. यामुळे सोनू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

तेलंगाणातील डब्बा टेंडा गावातील लोकांनी हे मंदिर उभारलं आहे. २० डिसेंबर रोजी या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मंदिरामध्ये ग्रामस्थांनी सोनू सूदचा एक पुतळा बसवला तसेच त्याची आरतीही केली. आरतीनंतर ग्रामस्थांनी ‘जय हो सोनू सूद’ अशी घोषणाबाजीही केली. लॉकडाउनमध्ये या गावच्या लोकांची सोनू सूदने मदत केली होती, गावातील लोकांनी या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे मंदिर उभारलं आहे. यावेळी गावातील लोकांनी पारंपारिक वेश परिधान केले होते.

“सोनू लोकांच्या अडचणीवेळी देवासारखा धावून आला होता त्यामुळेच त्याची जागा मंदिरात देवाठिकाणी आहे. त्यामुळे आम्ही सोनूसाठी मंदिर उभारलं आहे. आमच्यासाठी तो देवचं आहे,” अशा शब्दांत जिल्हा परिषद सदस्य गिरी कोंडाल रेड्डी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

तसेच सोनू सूदचा पुतळा साकारणारे कलाकार मधुसूदन पाल म्हणाले, “आपल्या मदतशीर स्वभावाने या अभिनेत्यानं लोकांच्या हृदयात जागा निर्माण केली आहे. त्यामुळे मी देखील त्यांना भेट म्हणून सोनूची छोटीशी मूर्ती तयार केली.”

दरम्यान, सोनू सूदने देखील लोकांच्या या भावनांची दखल घेत भावनिक ट्विट केलं. ‘मी यासाठी अपात्र आहे’ अशा शब्दांत सोनूने आपली जागा मंदिरात नसल्याचं सूचकपणे म्हटलं आहे.