करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. आतापर्यंत देशभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. अनेकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोक बेरोजगार झाले आहेत. शिवाय करोनाला रोखणारी कुठलीही अधिकृत लस अद्याप तयार झालेली नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीत गरजवंतांची मदत करा, अशी विनंती अभिनेता सोनू सूदने देशवासीयांना केली आहे. जे सक्षम आहेत त्यांनी पुढे या अन् किमान एका गरीब रुग्णाच्या औषधांचा खर्च उचला, अशी विनंती त्याने केली आहे.

अवश्य पाहा – ‘जनता तुला माफ करणार नाही’; रियाला पाठिंबा देणाऱ्या आयुषमानवर संतापला अभिनेता

“कृपया गरजवंतांची मदत करा. जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी पुढे या आणि करोना रुग्णांना मदत करा. गरीब रुग्णांना दत्तक घ्या किंवा त्यांच्या औषधांचा खर्च उचला. जर आपण अशी मदत केली तर करोनाचं संकट हळूहळू कमी होत जाईल.” अशा आशयाचं ट्विट सोनू सूदने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – WWE मध्ये नोकर कपात; या सुपरस्टार्सला दाखवला बाहेरचा रस्ता

देशातील करोना रुग्ण १९ लाखांवर

गेल्या २४ तासांमध्ये ५२ हजार ५०९ रुग्णांची नोंद झाली असून ८५७ मृत्यू झाले आहेत. एकूण करोना रुग्णांची संख्या १९ लाख ८ हजार २५४ वर पोहोचली असून ३९ हजार ७९५ मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ५१ हजार ७०६ रुग्ण बरे झाले. ५ लाख ८६ हजार २४४ रुग्ण उपचाराधीन आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

१९ जुलै ते ४ ऑगस्ट या १७ दिवसांपैकी १५ दिवस करोनारुग्णांची दैनंदिन वाढ ४० हजारांहून अधिक राहिलेली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश ही मोठी राज्येच नव्हे तर छोटय़ा राज्यांमध्येही रुग्ण वाढत आहेत. गोवा सात हजार, त्रिपुरा ५.५ हजार, मणिपूर तीन हजार, नागालँड २५००, पुडुचेरी या राज्यांमध्ये चार हजार रुग्णांची नोंद झाली आहे. मेघालय, सिक्कीम, अंदमान-निकोबार या तीनच राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या एक हजारांपेक्षा कमी असल्याचे सांगण्यात आले.