बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सोशल मीडियावर सतत चर्चेत असतो. तो कधी गरीबांना मदत करतो तर कधी यूजर्सला भन्नाट रिप्लाय देताना दिसतो. सोनू सूदने लॉकडाउनच्या काळात अनेक प्रवासी मजदूर कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास मदत केली. त्यानंतर सोनू सूदने अनेक गरीबांनादेखील सोशल मीडियाद्वारे मदत केली. पण आता सोनू सूद करत असलेल्या मदतीवर अनेकांनी प्रश्न विचारले आहेत. इतकेच नव्हे तर काही ट्रोलर्सने सोनू सूदला ‘फ्रॉड’ देखील म्हटेल आहे. सोनू सूदने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

नुकताच सोनू सूदने बरखा दत्त यांच्याशी गप्पा मारल्या. त्यावेळी त्याने फ्रॉड म्हणत ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिले आहे. ‘मला असे वाटते की ट्रोल करणे हा त्यांचा पेशा असल्यामुळे ते असं करत आहेत. पण या गोष्टीचा माझ्यावर परिणाम होत नाही. मी जे काम करत आहे ते कायम करत राहीन’ असे सोनू सूदने म्हटले आहे.

‘जेव्हा मी लहान होतो तेव्हा एक गोष्ट ऐकली होती. एका साधूकडे एक घोडा असतो. ते दोघे जंगलामध्ये जात असतात त्यावेळी तेथे एक डाकू येतो आणि त्या साधूकडे घोडा मागतो. साधू त्या डाकूला घोडा देण्यास नकार देतो आणि पुढे निघून गेला. पुढे जंगलात गेल्यावर साधूला एक वृद्ध व्यक्ती दिसते. त्या व्यक्तीला चालताना त्रास होत असल्याचे साधूने पाहिले. साधू तो घोडा त्या वृद्ध व्यक्तीला देतो. ती वृद्ध व्यक्ती घोड्यावर बसते आणि तो हे सगळे नाटक करत असून एक डाकू असल्याचे साधूला सांगतो. त्यावेळी साधू त्या डाकूला म्हणतो घोडा घेऊन जा पण तू तो माझ्याकडून कसा मिळवलास हे कोणाला सांगू नकोस. कारण लोकांचा चांगली कामे करणाऱ्यांवरचा विश्वास कमी होईल’ असे सोनू सूद म्हणाला.

पुढे तो म्हणाला, ‘जे लोकं दावा करतात मी फ्रॉड आहे त्यांच्यासाठी मी इतकच सांगेन की माझ्याकडे ७ लाख लोकांचा डेटा आहे ज्यांना मी मदत केली आहे. त्या लोकांचा पत्ता, फोन नंबर, आधार कार्ड ही सगळी माहिती माझ्याकडे आहे. ज्या विद्यार्थांना मी परदेशातून भारतात आणले त्यांची माहिती देखील आहे माझ्याकडे पण मला ती सर्वांसमोर सांगायची नाही. मला ट्रोल करण्यापेक्षा कोणाची तरी मदत करा.’