करोना विषाणूचे संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या प्राणघातक विषाणूमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या प्रतिकूल परिस्थितीत देशवासीयांच्या मदतीसाठी अनेक सेलिब्रेटींनी मदतीचा पुढे केला. मात्र या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चा होतेय ती अभिनेता सोनू सूदची. आतापर्यंत त्याने एक हजारांपेक्षा अधिक मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवले आहे. या पार्श्वभूमीवर सोनू सूदच्या नावाने आता खोटे मेसेज सोशल मीडियावर पसरवले जात आहे. त्याचं नाव सांगून मजुरांकडून पैसे लुबाडले जात आहेत. या खोट्या मेसेजपासून सावधान राहण्याचा सल्ला सोनूने दिला आहे.

सोनू सूदने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका खोट्या मेसेजचा फोटो ट्विट केला आहे. “कृपया अशा प्रकारच्या खोट्या मेसेजच्या जाळ्यात अडकू नका. मदतीच्या बदल्यात आम्ही कोणाकडूनही पैसे घेतलेले नाहीत. आमची सेवा मोफत आहे. त्यामुळे जर कोणी आमचे नाव सांगून पैशांची मागणी करत असेल तर त्याची पोलिसांकडे तक्रार करा.” अशा आशयाचा मेसेज सोनू सूदने केला आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सोनूने महाराष्ट्र सरकारकडून विशेष परवानगी घेऊन काही गाड्यांची सोय केली आहे. या गाड्यांमार्फत महाराष्ट्रातील मजूरांना त्यांच्या गावी नेऊन सोडले जात आहे. लक्षवेधी बाब म्हणजे ही सोय तो विनामुल्य देत आहे. “शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं त्याने अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. आनंदाची बाब म्हणजे या वाक्याचे तो तंतोतंत पालन करत आहे. त्याच्या मदतीमुळे मजुरांना त्यांच्या गावी सोडण्याचा महाराष्ट्र सरकारवरचा भार काही प्रमाणात कमी झाला आहे असे म्हटले जात आहे. यापूर्वी सोनुने एक हजार ५०० PPE किट्सची मदत केली होती. तसेच आपले हॉटेल करोनाग्रस्तांच्या उपचारासाठी खुले करुन दिले होते.