काही व्यक्तिरेखा अशा असतात ज्यांचे गारुड दशकानुदशके प्रेक्षकांच्या मनावरुन उतरत नाही. स्पायडरमॅन अशाच व्यक्तिरेखांपैकी एक आहे, ज्याने मार्व्हल युनिव्हर्सच्या माध्यमातून तब्बल ५७ वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य केले. परंतु यापुढे स्पायडरमॅन मार्व्हल सुपरहिरोपटांमध्ये दिसणार नाही. त्याने या युनिव्हर्समधून कायमची एक्झिट घेतली आहे.
कॉमिक्स लेखक स्टॅन ली व स्टीव्ह डिटको यांनी १९६२ साली स्पायडरमॅन या सुपरहिरोची निर्मिती केली. त्यानंतर १९९९ साली काही आर्थिक कारणांमुळे मार्व्हलने सोनी कंपनीला या सुपरहिरोचे सर्व हक्क विकून टाकले. कॉमिक्स व कार्टून मालिकांमध्ये यशस्वी झालेल्या स्पायडरमॅनवर चित्रपट देखील तयार केले गेले. आश्चर्याची बाब म्हणजे लहान मुलांचा सुपरहिरो म्हणून चिडवल्या जाणाऱ्या स्पायडरमॅनने चित्रपटांमध्येही कोट्य़ावधींची कमाई करुन दाखवली. दरम्यान आर्थिक तोट्यात गेलेल्या मार्व्हल स्टुडिओला २००७ साली द वॉल्ट डिस्ने या कंपनीने विकत घेतले. तेव्हापासून डिस्ने व सोनी कंपनी एकत्र मिळून स्पायडरमॅनवर चित्रपट तयार करत आहेत. दरम्यान गेली चार वर्षे स्पायडरमॅन चित्रपटांनी केलेल्या कमाईबाबत या दोन कंपन्यांमध्ये वाद सुरु होते. अखेर हे मतभेद गेल्या काही दिवसात शिगेला पोहोचले परिणामी सोनी कंपनीने स्पायडरमॅनबाबत केलेला करार रद्द करुन मार्व्हल युनिव्हर्सला कायमचा रामराम ठोकला आहे.
स्पायडरमॅनने अचानक घेतलेल्या या निवृत्तीमुळे डिस्ने कंपनीला जबरदस्त आर्थिक फटका बसला आहे. कारण अॅव्हेंजर्स एंडगेमने मिळवलेल्या तुफान यशानंतर त्यांनी कोट्यावधींची गुंतवणूक स्पायडरमॅनवर केली होती. मार्व्हलने स्पायडरमॅनला गृहीत धरुनच आपल्या आगामी १० चित्रपटांचे नियोजन आखले होते. परंतु आता स्पायडरमॅनच गेल्यामुळे डिस्ने आर्थिक कचाट्यात अडकली आहे.