नायकप्रधान हिंदी चित्रपटसृष्टीत ऐंशीच्या दशकात दक्षिणेतून आलेल्या ‘श्रीदेवी’ नावाच्या अभिनेत्रीनं अव्वल दर्जाचं काम करून ‘सुपरस्टारपद’ पटकावलं. आज ही अभिनेत्री आपल्यात नाही पण जाता जाता श्रीदेवींनी आपल्या अभिनयानं चित्रपटसृष्टीत स्वत:चं स्थान ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळ केलं. चित्रपटसृष्टीतील त्यांची अकाली एक्झिट संपूर्ण देशाला चटका लावून गेली. २४ फेब्रुवारी २०१८ साली त्यांचं निधन झालं. वो ‘चाँदनी’ ना रही, गहरा सदमा दे गई! यांसह अनेक भावपूर्ण ओळींद्वारे त्यांच्या चाहत्यांनी श्रीदेवींना श्रद्धांजली अर्पण केली.
तामिळ, मल्याळम, तेलगू, कन्नड आणि हिंदी अशा पाच चित्रपटसृष्टी अभिनयाच्या जोरावर त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. वयाच्या चौथ्या वर्षांपासून कॅमेराला भय वाटेल इतका हरहुन्नरी भावपूर्ण अभिनय त्यांनी तितक्याच सशक्तपणे साकारला. १९७९ साली हिंदी बोलताही न येणारी ही गोलाकार चेहऱ्याची ललना हिंदी चित्रपटात नायिका बनली. १९७७ ते ८३ या काळात कमल हासनसोबत त्यांनी अनेक चित्रपटांत भूमिका केल्या. ‘मिस्टर अॅण्ड मिसेस मालिनी अय्यर’ हा त्यातलाच एक. पण ‘सदमा’ हे या दोघांच्या अभिनयाचं यशोशिखर मानलं जातं. ‘हिम्मतवाला’मध्ये हंटर घेऊन अरेरावी करणारी श्रीमंत बापाची मुलगी सर्वगुणसंपन्न नायकाच्या परीसस्पर्शाने ‘सजना पे दिल आ गयाँ’ हे स्वप्नगीत म्हणताना लोकांनी स्वीकारली आणि श्रीदेवी पर्वाचा उदय झाला. नाझ या अभिनेत्रीचा हिंदी आवाज डबिंगसाठी वापरून त्यांनी आपले सुरुवातीचे सारे हिट चित्रपट दिले.
‘इन्कलाब’, ‘मकसद’, ‘मवाली’, ‘तोहफा’ यांच्यासोबत डझन-दोन डझनांहून अधिक हिंदी चित्रपट श्रीदेवी यांनी त्या काळात दिले. त्या वर्षांत ग्लॉसी मासिकांच्या, वृत्तपत्रीय पुरवण्यांच्या, सिनेसाप्ताहिकांच्या अग्रभागी झळकलेल्या श्रीदेवी या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्री बनल्या. दक्षिणेतूनच हिंदीत आलेल्या जयाप्रदा आणि श्रीदेवी यांचे स्टारपदासाठी अभिनययुद्ध रंगविले गेले. जयाप्रदा त्यात मागे पडल्या, श्रीदेवी ‘चाँदनी’ बनून हिंदी चित्रपटक्षेत्रावर व्यापून गेल्या. बोनी कपूर यांनी ‘मिस्टर इंडिया’साठी खास त्यांची निवड केली आणि नंतर पडद्यावर वीज तडकवणारी ही ‘हवाहवाई’ नायिका ‘चालबाज’, ‘लम्हे’सारख्या चित्रपटांतून आपले अभिनयाचे पहिले पर्व समरसून जगली.
श्रीदेवीच्या सुरुवातीच्या बहुतांश भूमिका या भारतीय आदर्शवादी प्रेयसी-पत्नीच्या रूपातील होत्या. ‘चांदनी’ या चित्रपटानंतर त्यांनी स्वत:चा आवाज चित्रपटात वापरायला सुरुवात केली. यापूर्वीचे त्यांचे अनेक चित्रपट डब केले होते. बॉलिवूडमध्ये ब्रेक घेतल्यानंतर त्यांनी गौरी शिंदे यांच्या ‘इंग्लिश विंग्लिश’मधून पुन्हा कमबॅक केलं. हा चित्रपट सुपरहिट चित्रपट ठरला होता. ‘मॉम’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला तर गेल्यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ या चित्रपटात श्रीदेवी यांची अगदी छोटीशी भूमिका होती.