अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) शनिवारी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकत १२ लोकांना अटक केली आहे. ज्यामध्ये ९ पुरुष आणि ३ मुलींचा समावेश आहे. या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना रविवारी अटक केली. दरम्यान या क्रूझवर एनसीबी अधिकाऱ्यांनी वेशभूषा बदलून छापेमारी केल्याची माहिती समोर येत आहे.

क्रूझवर फिल्मी स्टाईल छापेमारी

मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापेमारी करण्याची संपूर्ण योजना बनवली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखचा मुलगा आर्यन खान हा ड्रग्ज तस्करांशी वारंवार संपर्कात होता. याची माहिती यापूर्वीच एनसीबीला मिळाली होती. त्यामुळेच आर्यन खानला अटक करण्यासाठी एनसीबीने संपूर्ण योजना तयार केली होती. या क्रूझवर ज्या ठिकाणी रेव्ह पार्टी होणार होती, त्याठिकाणी १२०० ते १३०० जण उपस्थित होते. यावेळी एनसीबी मोठ्या हुशारीने त्या गर्दीतून ८ ते १० जणांचा शोध घेतला. यावेळी एनसीबीला या पार्टीत आर्यन खान सहभागी होणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. विशेष म्हणजे एनसीबीने आर्यन खान आणि अरबाज मर्चंट या दोघांवर नजर ठेवण्यावर एक वेगळा अधिकारी तैनात करण्यात आला होता.

या क्रूझवर आर्यन खानच्या नावे कोणताही खास रुमचे बुकींग करण्यात आले नव्हते. मात्र या पार्टीच्या आयोजकांनी आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांच्यासाठी कॉम्प्लीमेंट्री रुम दिला होता. ज्यावेळी ते दोघेही या कॉम्प्लीमेंट्री रुममध्ये जात होते, त्याचवेळी एनसीबीच्या काही अधिकारी त्यांच्या समोर आले आणि त्यांनी त्यांना अडवले. त्यानंतर त्या दोघांची झाडाझडती घेतली असता, आर्यनकडे काहीही मिळाले नाही. मात्र अरबाज मर्चंटच्या बुटात चरस मिळाली.

त्यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्या दोघांचे मोबाईल फोन जप्त केले. यावेळी त्यांच्या हाती काही चॅट्स लागले आहेत. ज्यात दोघेही चरसच्या वापराबद्दल बोलत होते. आर्यन खानच्या चौकशीत याबाबतची कबुलीही दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, आर्यन खान आणि अरबाज मर्चंट हे ड्रग पॅडलरच्या सतत संपर्कात होते, याची एनसीबीला आधीच माहिती मिळाली होती. या दोघांचा एनसीबी बराच काळ शोध घेत होती. त्यानंतर त्या दोघांना रेव्ह पार्टीदरम्यान जाताना पकडले.

हेही वाचा – धक्कादायक! आर्यन खान गेल्या चार वर्षांपासून घेत होता ड्रग्ज, चौकशीत खुलासा

नेमकं प्रकरण काय?

आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर ‘एनसीबी’ने शनिवारी ही कारवाई केली. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी, २ ऑक्टोबरला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कार्डेलिया क्रूझवर छापा टाकला. त्यात पाच ग्रॅम मेफ्रेडॉन (एमडी), १३ ग्रॅम कोकेन, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या व एक लाख ३३ हजारांची रोकड जप्त करण्यात आले आहेत. सशयितांच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.

‘एनसीबी’ने आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. दिवसभर वांद्रे, अंधेरी, लोखंडवाला, नवी मुंबईसह आणखी काही ठिकाणी शोधमोहीम राबवून संशयित अमली पदार्थ विक्रेत्यांची चौकशी करण्यात आली. यादरम्यान एकाला ताब्यात घेण्यात आले. रविवारी सकाळी ताब्यात घेण्यात आलेल्या आठ जणांना ‘एनसीबी’च्या अधिकाऱ्यांनी मुंबईतील कार्यालयात आणले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.