‘बाहुबली- द कनक्ल्युजन’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘अमरेंद्र बाहुबली’ आणि त्याचं ‘माहिष्मती’ साम्राज्य यांच्याभोवती या चित्रपटाचं कथानक फिरणार असल्याचं म्हटलं जातंय. एस. एस. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटामध्ये ‘बाहुबली’ आणि ‘भल्लालदेव’ या दोन योद्ध्यांसोबतच चित्रपटातील नायिकाही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटामध्ये देवसेना (अनुष्का शेट्टी), शिवगामी (रम्या कृष्णन) आणि अवंतिका (तमन्ना भाटिया) या व्यक्तिरेखांच्या लूकने प्रेक्षकांनी मनं जिंकली आहेत. त्यांचा हा लूक नेमका कसा ठरवण्यात आला, त्यासाठी किती मेहनत घेण्यात आली याबाबत एका मुलाखतीदरम्यान चित्रपटाच्या वेशभूषाकारांनी खुलासा केला. रमा राजामौली (एस.एस. राजामौलींची पत्नी) आणि प्रशांती तिपिरनेनी यांनी बाहुबली चित्रपटातील कलाकारांच्या लूकवर बरीच मेहनत घेतल्याचं चित्रपट पाहताना लक्षात येतं.
‘बाहुबली’मधील या अभिनेत्रींच्या लूकसाठी रमा आणि प्रशांती यांनी बरीच मेहनत घेतली होती. त्यांच्या साड्यांच्या रंगांपासून ते अगदी साड्या नेसण्याच्या पद्धतींपर्यंत प्रत्येक गोष्टीत विविधता आणण्यासाठी बऱ्याच चर्चांनंतर हे लूक निश्चित करण्यात आले. याविषयी सांगताना प्रशांती म्हणाली, ‘मी देवसेनेच्या वेशभूषेवर काम केलं. मुळात रमा आणि मी खूप चांगल्या मैत्रिणी असल्यामुळे काम करताना आम्हाला त्याचा फायदाच झाला. हे लूक ठरवताना, त्या काळच्या स्त्रियांची साडी नेसण्याची पद्धत ठरवताना आम्ही ‘अमर चित्रकथां’पासून ‘चंदामामा’पर्यंतच्या पुस्तकांचा आधार घेतला. यामध्ये सर्वाधिक मदत झाली ती म्हणजे ‘राजा रवि वर्मा’ यांच्या चित्रांची. त्या चित्रांमधून झळकणारे स्त्रीसौंदर्य आणि त्यांची एकंदर वेशभूषा पाहता साड्या नेसण्याच्या विविध पद्धतींची प्रेरणा आम्हाला तिथूनच मिळाली.’, असं प्रशांतीने सांगितलं.
प्रशांतीच्या वक्तव्याशी सहमत होत रमा राजामौलीनींसुद्धा या चित्रपटाच्या लूकविषयी आणखी माहिती दिली.
‘देशविदेशातील ‘बाहुबली’चा प्रेक्षकवर्ग पाहता आम्ही तसाच लूक ठरवण्यासाठी प्रयत्नशील होतो. हे खरंतर आव्हानात्मक होतं. कारण जागतिक पातळीवर प्रेक्षकांवर छाप पाडेल असाच लूक आम्हाला हवा होता. त्यामुळे काही पारंपरिक गोष्टींच्या आधारे हे लूक निश्चित केले. याचाच एक भाग म्हणजे शिवगामीची साडी नेसण्याची पद्धत. पारंपरिक नऊवारी साडीचाच वापर करत फक्त ती नेसण्याची पद्धत बदलून आम्ही शिवगामीचा लूक ठरवला. शिवगामी लूक ठरवताना तिचा राजेशाही बाज, व्यक्तिमत्त्व आणि ताकद या सर्व गोष्टी नजरेत घेण्यात आल्या होत्या.’ असं रमाने स्पष्ट केलं.
शिवगामीच्या वेशभूषेप्रमाणेच देवसेनेच्या भूमिकेसाठीही फ्लॉरल डिझाईन असणारी साडी ठरवण्यात आली. कलासक्त देवसेनेच्या भूमिकेला हा लूक साजेसा असल्यामुळे त्यालासुद्धा प्रेक्षकांची दाद मिळत आहे. देवसेना आणि शिवगामीच्या तुलनेत अवंतिका म्हणजेच तमन्ना भाटियाचा लूक ठरवण्यासाठी जास्त मेहमत घेण्यात आली. कारण ‘बाहुबली’मध्ये अवंतिका ही एक योद्धा आहे, त्यामुळे तिचा लूक ठरवताना बऱ्याच गोष्टींचं निरीक्षण करण्यात आलं होतं. तमन्नाचा वॉरियर लूक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तिला धोतर आणि चामड्याच्या कॉम्बिनेशनचे कपडे देण्यात आले. मुख्य म्हणजे अवंतिका जंगलात राहणारी असल्यामुळे तिच्या त्वचेचा सावळा वर्ण फार महत्त्वाचा होता. त्यामुळे मग मेकअपच्या साह्याने तिच्या त्वचेचा रंग बदलण्यात आला. प्रत्येक शॉटच्या वेळी त्याच रंगाशी मिळतीजुळती शेड बनवण्यासाठी बरीच मेहनत आणि वेळ दवडला गेला होता असं म्हणत रमा राजामौली यांनी तमन्नाच्या लूकवरुन पडदा उचलला.

बाहुबलीमधील अभिनेत्रींच्या हेअरस्टाइल्सही ‘चंदामामा’ आणि ‘अमर चित्रकथा’ या पुस्तकापासून प्रेरित होत्या. मुख्य म्हणजे ‘बाहुबली- द बिगिनिंग’मध्ये शिवगामीने जे सुवर्णालंकार परिधान केले होते ते सर्व आमचे स्वत:चे दागिने होते असं रमाने सांगितलं. त्याशिवाय ‘बाहुबली २’ मध्ये कलाकारांनी परिधान केलेले सर्व दागिने हे चांदीचे असून त्यावर सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे.

रमा-प्रशांतीची ही मुलाखत आणि त्यातून उलगडलेली ही माहिती पाहता ‘बाहुबली’ खऱ्या अर्थाने ग्रॅण्ड ठरत आहे हे म्हणायला हरकत नाही. तर मग उद्या जगभरात ९००० स्क्रिन्सवर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची भव्यता अनुभवण्यासाठी तुम्हीही जाताय ना…?