नवी पिढी नेहमीच हुशार असते असं म्हटलं जातं. त्यांचा वेग हा आधीच्या पिढीला लक्षात न येण्यासारखाच असतो, याची प्रचीती सध्या बॉलीवूडलाही येते आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत ‘हिरो’ किंवा ‘हिरॉईन’ म्हणून कारकीर्द घडवण्यात काही वर्ष खर्ची घातलेल्या आणि तरीही मनासारखं यश मिळालंच असं नाही, ही परिस्थिती अनुभवलेल्या अगदी तत्कालीन ‘स्टार’ मुलामुलींनाही त्यांच्या पुढच्या पिढीने मात्र आपल्या करिश्म्याने अचंबित केलं आहे. सध्या ‘सैराट’ चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेल्या ‘धडक’ची पोश्टर्स प्रदर्शित झाली आहेत. हिंदीत रुपेरी पडद्यावर ‘धडक’ देणाऱ्या या दोन नव्या ताऱ्यांनी सध्या अबालवृद्धांना वेड लावलं आहे. हिंदीत आर्ची-परश्या येणार.. येणार अशी चर्चा होती. अगदी तशीच चर्चा,आर्चीच्या भूमिकेत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि परश्याच्या भूमिकेत शाहीद कपूरचा सावत्र भाऊ इशान खत्तार हे दोघंही बॉलीवूडमध्ये सैराट पदार्पण करणार अशी बॉलीवूडमध्येही सुरु होती.  ‘आर्ची-परश्या’ स्टाइलमध्ये या दोघांच्या ‘धडक’ चित्रपटाचे पोश्टर प्रदर्शित झाले तेव्हा खरोखरच या भूमिकांसाठी हे दोघे चपखल निवड असल्याचा विश्वास सगळ्यांकडून व्यक्त झाला. करण जोहर या हिंदी रिमेकची निर्मिती करीत असून दिग्दर्शन अपूर्व मेहता यांचे आहे. बॉलीवूडच्या स्टार किड्सचे पालकत्व घेत त्यांना रुपेरी पडद्यावर यशस्वी पदार्पण करून द्यायचं शिवधनुष्य करण जोहरने पेललं असल्याने अलिया भट्ट, वरुण धवननंतर जान्हवी कपूर, इशान खत्तार या दोघांनाही लाँच करण्याची जबाबदारी त्याने घेतली आहे. खरं तर इशानचं पदार्पण आणखी वेगळं ठरणार आहे. ‘धडक’ हा त्याचा पहिला चित्रपट नसून माजिद मजिदी दिग्दर्शित ‘बियाँड द क्लाऊड्स’ या चित्रपटातून त्याचं पदार्पण होणार आहे. या दोघांबरोबर म्हणण्यापेक्षा त्यांच्याही आधीपासून सारा अली खान हे नाव इन्स्टापासून सगळ्या समाजमाध्यमांवर फिरत होतं. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची ही कन्या अभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ या चित्रपटातून पदार्पण करते आहे. साराचा पहिला चित्रपट कोणता असेल? याहीपेक्षा तिचा नायक कोण यावरूनच जास्त चर्चा रंगली होती. अनेक नावं चाळत-चाळत  हिरो म्हणून सुशांत सिंग राजपूतवर शिक्कामोर्तब झालं आहे. सुशांत हा दिग्दर्शक अभिषेक कपूरचा लाडका अभिनेता असल्याने त्याची निवड झाली यात आश्चर्य नाही. पण पडद्यावर ही जोडी कशी दिसेल, याची उत्सुकता इंडस्ट्रीतही अनेकांना आहे. सारा, इशान आणि जान्हवी या त्रिमूर्तीबरोबरच आणखीही काही चेहरे येत्या काही दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये तुम्हाला हिरो-हिरॉईन म्हणून आपली इनिंग खेळताना दिसणार आहेत. सनी देओलचा मुलगा करण देओल ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून पदार्पण करतो आहे. त्याचं दिग्दर्शन खुद्द सनी देओलच करतोय. तर सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी या वर्षांअखेरीस साजिद नाडियादवाला निर्मित चित्रपटातून झळकणार आहे. तर रोहन मेहरा हे एक वेगळं नाव सध्या प्रकाशझोतात आलं आहे. ‘घर’, ‘बर्निग ट्रेन’सारख्या चित्रपटांतून काम केलेले बॉलीवूडचे दिवंगत अभिनेते विनोद मेहरा यांचा मुलगा रोहन बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘बाजार’ या चित्रपटातून तो पदार्पण करतो आहे. यात तो सैफ अली खानबरोबर काम करताना दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star kids ready to make their bollywood debut
First published on: 19-11-2017 at 02:14 IST