स्टार प्लस वाहिनीवरील ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कॉमेडी शोचे नवीन पर्व सुरू झाल्यापासून तो विविध कारणांमुळे चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करण्यात प्रसिद्ध असलेल्या कॉमेडीयन श्याम रंगीलाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या मंचावर मोदींची हुबेहूब नक्कल करताना पाहायला मिळतो. मात्र, वाहिनीने रेकॉर्ड केलेला हा भाग प्रसारित करण्यास नकार देत कार्यक्रमातून त्याची हकालपट्टी केल्याचा आरोप त्याने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘द वायर’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत श्याम रंगीलाने हे आरोप केले आहेत. त्याने म्हटले की, ‘मोदी आणि राहुल गांधी यांची नक्कल करतानाचा हा भाग चित्रीत झाल्यानंतर जवळपास एक महिन्यांनंतर मला कार्यक्रमाच्या प्रॉडक्शन टीमकडून फोन आला. त्यांनी मला पुन्हा नव्याने चित्रीकरणासाठी बोलावले. मोदींची नक्कल करतानाचा भाग प्रसारित न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. तुम्ही राहुल गांधींची नक्कल करू शकता मात्र मोदींची नाही असे मला वाहिनीकडून सांगण्यात आले.’

या कार्यक्रमासाठी स्पर्धकांना ऑडिशन द्यावी लागते. पण, नरेंद्र मोदी आणि इतर नेत्यांची हुबेहूब नक्कल करतानाचे श्याम रंगीलाचे व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याला थेट कार्यक्रमात सहभागी होण्यास निमंत्रण दिले गेले.

कार्यक्रमासाठी मी जो भाग चित्रीत केला होता, त्यात केलेल्या मोदींच्या नकलेमुळे काही लोकांकडून विरोध होण्याची भीती असल्याने तो प्रसारित न करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रॉडक्शन टीमकडून त्याला सांगण्यात आले. इतकेच नाही तर जेव्हा श्याम रंगीला राहुल गांधींची नक्कल करण्यासाठी तयार होता, तेव्हा वाहिनीने तेही करण्यास नकार दिला आणि कार्यक्रमातून त्याची हकालपट्टी करण्यात आली.

कार्यक्रमात श्याम रंगीलाने केलेल्या सादरीकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मात्र चांगलाच व्हायरल होत आहे आणि अनेकांकडून त्याची स्तुतीही केली जात आहे. त्यामुळे मोदींची नक्कल केल्याने कार्यक्रमातून त्याची हकालपट्टी करणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न उपस्थित केला जातोय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Star plus allegedly removes shyam rangeela for mimicking narendra modi from the great indian laughter challenge
First published on: 26-10-2017 at 14:55 IST