आपल्या आवडत्या बॉलिवूड स्टार विषयी जाणून घेण्यासाठी चाहते फार उत्सुक असतात. एका चित्रपटासाठी कोट्यावधी रुपये मानधन घेणाऱ्या कलाकारांचे आलिशन घर आतून कसे असेल असा प्रश्न देखील अनेकांना पडतो. नुकताच अनिल कपूर यांची मुलगी रिया कपूर आणि मुलगा हर्षवर्धन कपूर यांनी घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांचा संपूर्ण बंगला आतून कसा दिसतो हे दाखवले आहे.
रियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रक्षाबंधन या सणानिमित्त घराचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने लहानपणीच्या आठवणी सांगतल्या असून भावंडंसोबत नाते कसे असते हे सांगितले आहे. तसेच व्हिडीओ शेअर करत तिने, ‘आपल्या भावंडांसोबत लहानाचे मोठे होणे ही आयुष्यातील सर्वात मोठी आणि आनंददायी गोष्ट असते. ते आपले सर्वात जवळचे मित्र असतात आणि आपण त्यांच्या शिवाय राहू शकत नाही. तुम्ही कितीही मोठे झालात, कामात व्यग्र झालात किंवा त्यांच्यापासून लांब गेलात तरी तुमचे त्यांच्यासोबतचे नाते कायम असते’ असे तिने म्हटले आहे.
‘माझे माझ्या भावंडांसोबत असेच आहे नाते. आम्ही लहानपणापासून एकमेकांसोबत आहोत’ असे रियाने पुढे म्हणत त्यांचा बंगला आतून कसा दिसतो हे दाखवले आहे. या व्हिडीओमध्ये तिने त्यांच्या घरातील लिविंग रुम, सोनम आणि तिचा बेडरुम, हर्षवर्धनचा बेडरुम, घरातील थिएटर रुम हे सर्व दाखवले आहे.
