पॉर्नपटांना अलविदा करत बॉलिवूडमध्ये कमी काळात जम बसविलेली अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. सौंदर्य आणि नृत्यकौशल्याच्या बळावर तिने इंडस्ट्रीमध्ये आपलं स्थान भक्कम केलं. विशेष म्हणजे चाहत्यांमध्येही तिची लोकप्रियता अफाट आहे. तिच्या याच लोकप्रियतेमुळे सध्या ती अनेक कार्यक्रमांच्या मंचावर हजेरी लावत असते. काही दिवसांपूर्वीच तिने अभिनेता अरबाज खानच्या ‘पिंच’ या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. मात्र या मंचावर अरबाजने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देतांना सनीच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्याचं  पाहायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘पिंच’च्या सेटवर प्रश्न-मंजुषांच्या खेळ रंगत असताना अरबाजने सनीला तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवर चाहत्यांच्या येणाऱ्या कमेंटविषयी काही प्रश्न विचारले होते. यापैकी एका प्रश्नाचं उत्तर देतांना सनीला अश्रू अनावर झाले. २०१८मध्ये सनीने एक पोस्ट करत तिच्या एका सहकाऱ्याला आर्थिक मदत करण्याचं आव्हान केलं होतं. सनीने केलेल्या या पोस्टवर काहींनी सकारात्मक कमेंट केल्या तर काहींनी सनीवर टीकेची झोड उठविली होती. ‘सनी गर्भश्रीमंत असून देखील ती साधी २० लाखांची मदत करु शकत नाही का’? यासारखे प्रश्नही तिला नेटकऱ्यांनी विचारले होते. याविषयी बोलताना “मी प्रभाकरला अखेरपर्यंत मदत करत राहिले मात्र त्याला वाचवू शकले नाही”, ही खंत व्यक्त करत सनी भावुक झाली.

“प्रभाकर माझ्या टीमपैकी एक होता. तो माझ्या कुटुंबातील एक भाग असल्याप्रमाणेच त्याचा आमच्यासोबत वावर होता. माझ्या अनुपस्थितीत तो माझ्या टीमची आणि घराची काळजी घ्यायचा. प्रभाकरची किडनी निकामी झाल्याचं समजल्यानंतर आम्ही साऱ्यांनीच त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला होता. शक्य होईल तितकी आर्थिक मदतही केली होती. मात्र त्याच्यावर या आजारपणाचीच नाही तर त्याच्या कुटुंबियांचीदेखील जबाबदारी होती. त्यामुळे या परिस्थितीतून त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न केले होते. मी शेवटपर्यंत प्रयत्न करत राहिले. मात्र त्याला वाचवू शकले नाही”, असं सनीने पिंचच्या सेटवर सांगितलं.

दरम्यान, २०१८मध्ये सनीने इन्स्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट लिहीत प्रभाकरचा फोटो शेअर केला होता. या पोस्टमध्ये तिने प्रभाकरला वाचविण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केलं होतं. मात्र नेटकऱ्यांनी तिलाच ट्रोल केलं होतं. मात्र पिंचच्या मंचावर सनीने या पोस्टवर स्पष्टीकरण देत प्रभाकरच्या आठवणींनाही उजाळा दिला. मात्र प्रभाकरचं नाव घेताच तिच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचं साऱ्यांनीच पाहिलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone cried in front of arbaaz khan here is the reaseon
First published on: 23-04-2019 at 18:03 IST