‘सुपरहिरो’ हा मनोरंजन क्षेत्रातील सध्याचा ट्रेंडिग विषय. आजवर कॉमिक्स आणि कार्टून सीरिजमधून डोकावणाऱ्या या सुपरहिरोंनी आता चित्रपटात देखील मजल मारली आहे. अगदी अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ या सुपरहिरोपटाने तर या जॉनरकडे बघण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. आजवर केवळ लहान मुलांचा विषय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या सुपरहिरोंनी आज कमाईच्या बाबतीत मेनस्ट्रिम चित्रपटांना देखील मागे सोडले आहे. असे असताना आपला भारतीय सुपरहिरो ‘शक्तिमान’ तरी मागे कसा राहील? लॉकडाउनच्या निमित्ताने का होईना भारतातील पहिला सुपरहिरो शक्तीमान पुन्हा एकदा टीव्हीवर परतला आहे.

करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सरकारने देशात २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकाडाउनमुळे घरात बसलेल्या लोकांचे मनोरंजन व्हावे यासाठी डीडी नॅशनल वाहिनीवर ‘महाभारत’, ‘रमायण’, ‘ब्योमकेश बक्शी’ अशा सर्व लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा सुरु करण्यात आल्या. या यादीत प्रेक्षकांच्या आग्रहास्तव आता शक्तिमान या सुपरहिरोची देखील भर पडली आहे. एक एप्रिलपासून दररोज दुपारी एक वाजता डीडी नॅशनल वाहिनीवर शक्तिमान ही मालिका दाखवली जाणार आहे.

शक्तिमान ही भारतीय टेलिव्हिजन इतिहासातील सर्वाधिक गाजलेली मालिका आहे. आठवड्यातून केवळ एकदाच प्रदर्शित होणारी ही मालिका जवळपास १२ वर्ष टिव्हीवर सुरु होती. या मालिकेचा शेवटचा भाग २००५ साली पोगो वाहिनीवर प्रदर्शित झाला होता. आश्चर्याची बाब म्हणजे अगदी शेवटच्या भागापर्यंत शक्तिमानच्या टीआरपीमध्ये घट झाली नाही. परंतु काही आर्थिक मतभेदांमुळे ही मालिका बंद करण्यात आली. मात्र लॉकडाउनच्या निमित्ताने शक्तिमान आता पुन्हा एकदा टीव्हीवर परतला आहे.