अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी सोमवारी प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची मुंबई पोलिसांनी दोन तास चौकशी केली. भन्साळींनी सुशांतला काही चित्रपटांचे ऑफर्स दिले होते, मात्र दुसऱ्या प्रॉडक्शन कंपनीशी करार केल्याने तो ते चित्रपट करू शकला नव्हता, अशी माहिती भन्साळींनी चौकशीदरम्यान पोलिसांना दिली. ‘मुंबई मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार, भन्साळींनी सुशांतला ‘गोलियों की रास लीला- राम लीला’ या चित्रपटाचीही ऑफर दिली होती. मात्र दुसऱ्या निर्मिती संस्थांशी केलेल्या करारामुळे त्याला या चित्रपटात काम करता आले नाही.

संजयी लीला भन्साळींसारख्या नामवंत दिग्दर्शकासोबत काम करता न आल्याने सुशांत नाराज होता. सुशांतच्या नैराश्यामागचं कारण व्यावसायिक वैर आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी आतापर्यंत २९ जणांचा जबाब नोंदवला आहे. यामध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्ती, महेश शेट्टी, संदीप सिंग, सुशांतचे वडील व बहिणी, दिग्दर्शक मुकेश छाबडा, अभिनेत्री संजना सांघी, सुशांतचा मॅनेजर, त्याच्या घरी काम करणारे कर्मचारी यांचा समावेश आहे. सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणीसुद्धा काही कलाकार करत आहेत.