लग्नाविषयी सुशांतचा असा होता प्लान; वडिलांचा खुलासा

लग्नाबाबत सुशांतशी एकदा बोलणं झालं होतं असं सांगत ते म्हणाले…

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येची घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्यात असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत त्याने कुटुंबीयांना काहीच सांगितलं नव्हतं. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी त्याच्या लग्नाबद्दल खुलासा केला. २०२१ पर्यंत लग्न करण्याचा सुशांतचा प्लान होता असं ते म्हणाले.

“सुरुवातीला सर्वकाही ठीक होतं. तो प्रत्येक गोष्ट सांगायचा. पण नंतर नंतर त्याला काय झालं काय माहित? त्याने आम्हाला सांगणं सोडून दिलं”, असं ते म्हणाले. अभिनेत्री अंकिता लोखंडेने याआधी पाटणामध्येही सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या सेटवर सुशांत व अंकिता पहिल्यांदा भेटले होते आणि याच मालिकेच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले. सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं. सुशांतच्या वडिलांनी फक्त अंकिताची भेट घेतली होती. त्यांना रिया चक्रवर्तीबद्दल काहीच माहित नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

लग्नाबाबत सुशांतशी एकदा बोलणं झालं होतं असं सांगत ते पुढे म्हणाले, “लग्नाविषयी बोलणं झालं होतं. करोनाचं संकट असल्याने आता तरी लग्न करणार नाही असं त्याने सांगितलं होतं. करोनाचं संकट गेल्यावर एक चित्रपट प्रदर्शित होईल आणि त्यानंतर फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात लग्नाचा विचार करेन असं तो म्हणाला होता. त्याच्यासोबत हेच शेवटचं बोलणं झालं होतं. कोणाशी लग्न करणार हे मात्र त्याने सांगितलं नव्हतं.”

१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sushant singh rajput father confirms actor was looking to get married early 2021 ssv

Next Story
गॉसिप