भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्या जीवनावर आधारित चित्रपटानंतर प्रकाश झोतात आलेला अभिनेता सुशांत सिंग राजपूत सध्या यशाच्या शिखरावर आहे. यशाच्या शिखरावरुन सुशांत राजपूतला आता चंद्रावर जाण्याचे वेध लागले आहेत. अर्थात सुशांत राजपूत आगामी ‘चंदा मामा दूर के’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सुशांत अंतराळवीराची भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या या नव्या भूमिकेसाठी तो सध्या आवश्यक ती मेहनत घेताना दिसत आहे. सुशांतने भूमिकेसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्याच दिवशी सुशांतने विमानाचे यशस्वी उड्डाण करण्यात यश मिळविले. सुशांतने विमान प्रशिक्षणाच्या वेळीचा आपला एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये लोकप्रिय असणाऱ्या ट्विटरच्या  माध्यमातून शेअर केला आहे.

https://twitter.com/itsSSR/status/821284557915766784

या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय पूरण सिंग करणार असून  सुशांत सिंग राजपूतचा आगामी चित्रपट बॉलिवूडमधील एक वेगळा ठसा उमटविणारा चित्रपट असेल, असे संजय यांनी म्हटले आहे. असा चित्रपट बॉलिवूडमध्ये अद्याप निर्माण झालेला नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. सुशांतने शेअर केलेल्या व्हिडिओमुळे त्याच्या आगामी चित्रपटाबाबत चित्रपट चाहत्यांमध्ये नक्कीच उत्सुकता निर्माण होईल. मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख अथवा इतर बाबतीत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.

सुशांतच्या चित्रपट निवडीबद्दल बोलायचे तर ‘ज्या चित्रपटांबद्दल मला औत्सुक्य वाटते आणि ज्या चित्रपटांना माझ्या पाठिंब्याची गरज आहे असे चित्रपट मी करेन. असे मत सुशांतने एका मुलाखतीमध्ये काही दिवसांपूर्वी दिले होते. अर्थातच त्याचा हा आगामी चित्रपट त्याच्यासह चित्रपट चाहत्यांसाठी देखील उत्सुकतेचा असेल. दरम्यान, धोनीच्या जीवनावर आधारित या चित्रपटामध्ये एका खेळाडूच्या भूमिकेला न्याय देणारा सुशांत सिंग राजपूत त्याच्या आगामी चित्रपटात एका खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. पॅरालिम्पिक पदक विजेता खेळाडू मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित चित्रपटात सुशांत महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला अद्यापही सुरुवात झालेली नाही, पण या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी सुशांतचे नाव जवळपास निश्चितच करण्यात आले आहे. सध्या सुशांत ‘राबता’ आणि ‘पानी’ या चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यग्र आहे.